कोपरगाव तालुका
कोपरगावात अखेर..हे पोलीस दल दाखल !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आज प्रथमच नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधांसह किराणा व तत्सम अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोकळीक देण्यात आली होती. मात्र त्या कालखंडात काही नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे लक्षण दाखवत सामाजिक अंतराचा फज्जा उडवलेला दुर्दैवाने पाहावयास मिळाला असून एकीकडे पोलीस टवाळखोरांचा बस स्थानका नजीकच्या चौकात समाचार घेत होते तरीही अनेक हौसे-नवशे ये जा करताना दिसत होते हे विशेष ! तर लक्ष्मीनगर परिसरात कोरोना नियंत्रणासाठी अखेर कोपरगाव पोलिसांना राज्य राखीव पोलीस दलास पाचारण करावे लागले असून ते आज सकाळीच दाखल होऊन तैनात केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आता बेताल नागरिकांनी सावध होण्याची वेळ आली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसानी बस स्थानकासमोर अनेक नागरिक विशेषतः तरुणांना अडवून त्यांची वास्तपास्त विचारली जात होती व ती पटण्यासारखी नसली की त्याला रोख आहेर वाटप कार्यक्रम सुरु होता.काही वेळा बायको मागे बसलेली असताना काही नागरिकांना प्रसाद खाण्याचा दुर्मिळ योग आलेला दिसत होता.
दरम्यान काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एका ईशान्य गडावरील नेत्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडवलेला सामाजिक संकेतस्थळावर दिसून येत होता.त्यांना पोलीस प्रशासनाने परवानगी कशी दिली या बाबत अनेकांनी विचारणा केली होती.त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपण अशी कोणालाही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे व हे संदर्भीय छायाचित्र गत जयंतीचे असावेत असे म्हटले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १४८ ने वाढून ती ११ हजार ६३७ इतकी झाली असून ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती संख्या २ हजार ६८४ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १७८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २७ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.परंतु विविध योजनेचे पैसे सरकारने सध्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेले आहे.त्यामुळे नागरिकांना पैशाच्या गरजेमुळे बँकेमध्ये फार गर्दी होत असली तरी बऱ्याच ठिकाणी सामाजिक अंतराचे यथायोग्य पालन होत आहे. तसेच काही लाभार्थी पैशाची गरज असून देखील ही कोरोनाच्या भितीमुळे घराबाहेर पडणे टाळत आहे.मात्र काल तालुका प्रशासनाने दहा तारखेला लक्ष्मीनगर उपनगरात एक वृद्ध महिला आढळल्याने मात्र प्रशासनाची तारांबळ उडाली होती व त्यांनी लागलीच संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली होती त्या नंतर आज प्रथमच आज नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी काही काळासाठी सूट देण्यात आली होती.मात्र आज संभाजी चौका ऐवजी भाजीपाला बाजार स्टेशन रोड,टाकळी नाका, विघ्नेश्वर चौक,तहसील चौक परिसरात भाजीपाला नागरिकांना पांगुन बसवले होते.त्यामुळे गत वेळेपेक्षा हि गर्दी कमी होती एवढेच समाधान होते.