कोपरगाव तालुका
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढेच्या डोळ्याची शस्रक्रिया करणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असून आ.आशुतोष काळे नासिक येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञाकडून त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करणार असून त्यासाठी येणारा सर्व आर्थिक भार ते स्वत: उचलणार आहेत अशी माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव येथील एकेकाळची लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर ह्या वृद्धावस्थेत हलाखीचे जीवन जगत असल्याबाबतची बातमी सर्वप्रथम चांदेकसारे येथील कार्यकर्ते अरुण खरात यांनी समाज माध्यमावर निदर्शनास आणली होती.यानंतर विविध वर्तमानपत्र व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत थेट कोपरगाव येथील शांताबाईंच्या भाच्याच्या घरी जात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व तिला मदतीचे आश्वासन दिले होते.
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांची वृद्धापकाळामुळे होत असलेली व्यथा चांदेकसारे येथील कार्यकर्ते अरुण खरात यांनी प्रसिद्धी माध्यमातून पुढे आणल्यानंतर कोपरगाव बसस्थानकावर वास्तव्यास असलेल्या शांताबाई लोंढे सध्या शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात आहेत.शांताबाई कोपरगावकर यांची वृद्धापकाळामुळे होत असलेली ओढाताण पाहून आ.काळे यांनी देखील १० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते.ती मदत रोख स्वरुपात गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी स्वत: द्वारकामाई वृद्धाश्रमात शांताबाई कोपरगावकर यांची भेट घेवून त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
सदर प्रसंगी द्वारकामाई सेवा ट्रस्टचे श्रीनिवास बी.सौ.सुधा बी,गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,भाग्यश्री बोरुडे,विजय थोरात, बाळासाहेब रुईकर,शैलेश साबळे,डॉ.अशोक गावित्रे,अरुण खरात आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुष्पाताई काळे यांनी शांताबाई कोपरगावकर यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली असता.वृद्धापकाळामुळे त्यांच्या डोळ्याची नजर कमी झाली असून डोळ्याचे ऑपरेशन करणे गरजेचे असल्याचे समजले.त्यावेळी त्यांनी आ. काळे शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्याची शस्रक्रिया नासिक येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञाकडून करणार असल्याचे सांगितले.तसेच द्वारकामाई सेवा ट्रस्टचे वतीने द्वारकामाई वृद्धाश्रमात सर्व वृद्धांची होत असलेली सेवा व दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून द्वारकामाई सेवा ट्रस्टचे कौतुक केले आहे.