शैक्षणिक
कोपरगावात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयात स्टार्टअप अँड इनिवेशन सेल,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार जागृती अभियान भारत सरकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मार्च रोजी “बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मिस उज्वल व अमोल पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एस.यादव हे उपस्थित होते.
मिस उज्वल यांनी ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बौद्धिक संपत्ती संरक्षणासाठी कायदेशीर बाबी लक्षात आणुन त्याचे पेटंट कसे तयार करण्यात येते याविषयी मार्गदर्शन केले आहे. संपत्तीचे विविध प्रकार नमुद करतांना त्यांनी अमूर्त संपत्तीचे इतर संपत्तीप्रमाणे पेटंट,कॉपी राईट,इंडस्ट्रीयल डिझाईन,ट्रेड मार्क,भौगोलिक मानांकन (जी.आय.टॅग) या अनेक गोष्टीचांही यात समावेश होत असल्याचे सांगितले.अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात या कार्यशाळेचा उद्देश्य नमुद करतानांच उपस्थित सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शंकाचे विवेचन केले आहे.
कार्यशाळेचे प्रास्ताविक स्टार्टअप अँड इनिवेशन सेलचे समन्वयक डॉ.एस.जी.कोंडा यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,डॉ.एस.आर.पगारे आदींनी केले आहे.कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा.गुडघे,डॉ.गणेश चव्हाण व प्रबंधक डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेसाठी आयोजक महाविद्यालय व अन्य महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्राध्यापिका वर्षा आहेर यांनी तर आभार प्रा.निलेश पोटे यांनी मानले.