शैक्षणिक
के.जे.सोमैय्या महाविद्यालयाला गुणवत्तेचा पुरस्कार जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित ‘एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय’ या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता गुणवत्तेचे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले असून यात अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव येथील के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एकमेव विजेते ठरले आहे.या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
“जिल्ह्यातून के.जे.सोमैया महाविद्यालयाची निवड झाल्याने महाविद्यालयातील सर्व स्तरावर समाधान व्यक्त होत आहे.अशा प्रकारचा पहिलाच पुरस्कार महाविद्यालयास प्राप्त झाल्याने आनंद होत आहे.मात्र कोविडच्या प्रादुर्भावाने आपल्याभोवती निर्माण झालेल्या नकारात्मक मानसिकता थोडीफार तरी दूर होण्यासाठी हा पुरस्कार साह्यभूत ठरेल”-प्राचार्य डॉ.बी.एस.यादव.सोमैय्या महाविद्यालय,कोपरगाव.
महाविद्यालय परिसरातील स्वच्छता,स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न,जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाय योजना,घनकचरा व्यवस्थापन,सौर ऊर्जा प्रकल्प व त्याचा वापर, हरित संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना,सांडपाणी व्यवस्थापन या निकषांच्या आधारे के.जे.सोमैया महाविद्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव म्हणाले की,”महाविद्यालयात विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समित्या स्थापन करून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी नियमित केली जाते.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन महाविद्यालयात विविध विभागांमार्फत उपक्रम राबवून साजरे केले जातात.महाविद्यालयातील सांडपाणी प्रक्रिया करून महाविद्यालयाच्या शेजारून वाहणार्या गोदावरी नदीकाठी असलेल्या वृक्षांना दिले जाते.महाविद्यालय व स्थानिक गोदामाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नदी किनारी ‘अंबिका बन’ निर्माण केले आहे.या उपक्रमाचे कौतुक जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी स्वतः कार्यस्थळी येऊन केले होते.पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी महाविद्यालयात ४ लाख लिटर क्षमतेच्या टाक्या उभारल्या आहेत.या पाण्याचा वापर महाविद्यालयातील प्रयोगशाळा, रोपवाटीका व परिसरातील हिरवळ संवर्धनासाठी केला जातो. महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून यामुळे महावितरण कडून घेतल्या जाणाऱ्या वीजेत ५० टक्के बचत झाली आहे.महाविद्यालयातील सर्व पथदिवे सौर उर्जेवर कार्यान्वित आहेत. पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम पणे केले जाते.
महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाच्या वतीने कचऱ्याच्या विघटनाची व व्यवस्थापनाची शास्त्रीय पद्धतीने पुनर्वापर केला जातो.या सर्व व्यवस्थेची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट स्वयंसेवक असे पुरस्कार देखील महाविद्यालयाला मिळाले आहे.नॅक द्वारे ‘अ’ मानांकन सलग दुसऱ्यांदा मिळवणारे हे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय शिक्षण परिषदेने यापूर्वीच महाविद्यालयातला सामाजिक उद्योजकता,स्वच्छता व ग्रामीण विकास केंद्राची मान्यता दिली आहे.जिल्ह्यातून के.जे.सोमैया महाविद्यालयाची निवड झाल्याने महाविद्यालयातील सर्व स्तरावर समाधान व्यक्त होत आहे.अशा प्रकारचा पहिलाच पुरस्कार महाविद्यालयास प्राप्त झाल्याने आनंद होत आहे.मात्र कोविडच्या प्रादुर्भावाने आपल्याभोवती निर्माण झालेल्या नकारात्मक मानसिकता थोडीफार तरी दूर होण्यासाठी हा पुरस्कार साह्यभूत ठरेल.
महाविद्यालयाच्या या अहवाल समितीचे सदस्य म्हणून उपप्राचार्य डॉ.संतोष पगारे,एन.एस.एस.जिल्हा समन्वयक प्रा.शैलेंद्र बनसोडे,एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.एस.गायकवाड,बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रशांत भदाने,कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.संजय दवंगे,संजय पाचोरे यांनी काम पाहिले.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी,व्यवस्थापन सदस्य संदीप रोहमारे यांनी या यशाबद्दल महाविद्यालयातील व्यस्थपन अभिनंदन केले आहे.