सहकार
…या पतसंस्थेने गाठला हजार कोटींचा टप्पा !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
अत्याधुनिक तंत्रज्ञान,ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून १ हजार ९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे ठेविबाबत ही संस्था अव्वल ठरली असल्याचे मानले जात आहे.

समतांच्या ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान केली जाते.’सहकार उद्योग मंदिरा’त गावातील महिला बचत गटातील महिला येऊन अगरबत्ती,मेणबत्ती,कापूर,पेटिकोट तयार करतात.कोपरगाव शहरातील ‘माणुसकीच्या मंदिरा’ त गावातील लोक वापरलेल्या चपला,कपडे,बॅगा,औषधे आणून देत आहेत हे विशेष!
समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४ ची वर्षा अखेर आढावा बैठक संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संपन्न झाली.त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी बैठकीला संस्थेच्या उपाध्यक्ष श्वेता अजमेरे,संचालक रामचंद्र बागरेचा,चांगदेव शिरोडे,अरविंद पटेल,गुलशन होडे,निरव रावलिया,कचरू मोकळ,दिपक अग्रवाल संचालिका शोभा दरक आदींसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी,कर्मचारी,हितचिंतक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समता पतसंस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.८१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी ३८ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे.समताने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे.१९९४ या वर्षी १ कोटी रुपयांच्या ठेवी समताने संकलित केल्या होत्या.१९९९ ला १० कोटी, २०११ ला १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला होता.तर ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ३० डिसेंबर २०१९ ला पार करून आर्थिक क्षेत्रामध्ये झेप घेतली होती.त्या नंतर ३१ डिसेंबर २०२४ या वर्षा अखेरीस १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था म्हणून पल्ला गाठला आहे.
दि.३१ डिसेंबर २०२४ अखेर समता पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय १७७१ कोटी ४२ लाख इतका झाला असून सभासद संख्या ९५ हजार १११ इतकी आहे.ठेवी १ हजार ९ कोटी रुपये इतक्या झाल्या असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे.७६३ कोटी १९ लाख रुपये कर्ज वितरण केले असून २५३ कोटी रुपयांची अति सुरक्षित गुंतवणूक केली आहे.एकूण कर्ज वाटपात जगात सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज वाटप ४६८ कोटी रुपये इतके आहे.अधिकाधिक सुरक्षित कर्ज वाटपामुळे समता पतसंस्था सरकारी,खाजगी,सहकारी बँकांपेक्षाही अधिक सुरक्षितता ठेवीदारांच्या ठेवींना प्रदान करत आहे.एकूण कर्ज वाटपापैकी ६१ टक्के कर्ज वाटप जगातल्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्जाचे केलेले आहे.
केवळ १५ शाखांच्या माध्यमातून प्रति शाखा सरासरी ६६ कोटी रुपयांच्या ठेवी जमा करणे हा राज्यात विक्रम ठरलेला आहे.प्रति शाखा तब्बल ११८ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय करून कमीत कमी शाखांमध्ये जास्तीत जास्त संमिश्र व्यवसाय करणारी समता पतसंस्था महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची पतसंस्था ठरलेली आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोबाईल बँकिंग,सेल्फ बँकिंग,एन.ई.एफ.टी.,आर.टी.जी.एस.,व्हाउचरलेस बँकिंग,आदींसह जेष्ठ सभासदांना घरपोहच पेन्शन योजना आदी प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत.
समता पतसंस्था सहकार,आर्थिक क्षेत्रात विविध विक्रम करत असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.विशेषतः समता चॅरिटेबल ट्रस्ट,समता इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक व सामाजिक संस्था देखील नेहमीच अग्रभागी राहून सभासदांच्या सुख दुःखात सहभागी होत असतात.सामाजिक जाणिवेतून समताने सामाजिक कार्यात तत्परता दाखविली आहे.समताला होणाऱ्या नफ्याचा विनियोग सामाजिक कामाकरीता केला जात असल्याचा अनुभव आहे.
सामाजिक जाणिवेतून समताने कोपरगाव शहरात सहा मंदिरे उभारली आहे.परंतु ही मंदिरे देव देवतांची नसून मानवतेची,सहकाराची,सामाजिकतेची जाणीव असणारी मंदिरे आहेत.समता पतसंस्थेचे मुख्य कार्यालय हे ‘सहकार मंदिर’ मानले जात आहे.या मंदिरात ग्राहकांना पत निर्माण करून देणे.ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान केली जाते.’सहकार उद्योग मंदिरा’ त गावातील महिला बचत गटातील महिला येऊन अगरबत्ती,मेणबत्ती,कापूर,पेटिकोट तयार करतात.कोपरगाव शहरातील ‘माणुसकीच्या मंदिरा’ त गावातील लोक वापरलेल्या चपला,कपडे,बॅगा,औषधे आणून देतात.या वस्तू सर्वसामान्य,गरजू माणसांना ज्यांना हव्या असतील त्यांना मोफत दिल्या जातात.दरम्यान सदर संस्थेने योग,साई आश्रय मंदिर,आदींना मोठे योगदान दिले असल्याची माहिती दिली आहे.
सदर बैठकीचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयाच्या एच.आर.उज्वला बोरावके यांनी केले तर उपस्थितांचे आभार ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले आहे.