नगर जिल्हा
वर्ग-२ च्या जमिनी शेतकऱ्यांना द्याव्या लागतील-ऍड.अजित काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांनी बक्षिसी म्हणून देण्यात आलेल्या जमिनींचा नजराणा घेऊन जमिनी त्यांच्या नावावर करणे हा त्यांच्यावर व त्यांच्या पूर्वजांवर केलेला अन्याय असून हा अन्याय न्याय मार्गाने दूर करता येईल असे आश्वासन शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अड. अजित काळे यांनी कोऱ्हाळे येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
दरम्यान निळवंडे धरणाच्या कालव्यांबाबत बोलताना ते म्हणाले की,कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेला लढा मोलाचा ठरला आहे.यात राजकीय नेत्यांचे कोणतेही योगदान नाही.शेतकरी कालवा कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटले म्हणून हा लढा यशस्वी झाला आहे.त्यासाठी कृती समितीने पुरवलेले कागदी पुरावे मोलाचे ठरले आहे.आता काम कोणीही बंद करू शकत नाही.दीड-दोन वर्षात सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त करून आपण शेवटपर्यंत या लढ्यात सामील राहणार-अड.अजित काळे
निळवंडे कालव्याचे काम न्यायिक मार्गाने मार्गी लावल्याबद्दल निळवंडे कालवा कृती समीतीच्या राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शाखा व ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयाच्या वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांचा साईबाबा मंदिरात जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते गंगाधर पाटील डांगे हे होते.
सदर प्रसंगी अड. वैभव देशमुख,निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले, समितीचे जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,विठ्ठलराव पोकळे,सोमनाथ दरंदले,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,कौसर सय्यद,दत्तात्रय शिंदे गुरुजी,तान्हाजी शिंदे,भिवराज शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,दगडू रहाणे, पावलस कोळगे,आप्पासाहेब कोल्हे,अशोक गांडूळे,रावसाहेब मासाळ,उपसरपंच अनुसभाई शेख,दगुभाई सय्यद,माजी पंचायत समिती सदस्य गोपाळराव सोनवणे,कामगार नेते रमेश देशमुख,शाहीर हिरामण थोरात,कान्हू सुम्बे,सचिन मोमले,शशिकांत साब्दे,अमोल साब्दे आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.पत्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,पूर्वीच्या काळी राजे-राजवाड्यांच्या या जमिनी सैन्यात वेगवेगळे पराक्रम केल्याने किंवा विशेष कार्य केल्याने त्या त्या काळी या जमिनी बक्षिसी,वतन, इनाम म्हणून बहाल करण्यात आल्या होत्या त्यामुळे तो लौकिक अर्थाने तत्कालीन नागरिकांना,सैनिकांना सरदारांना,वतनदारांना त्यांच्या पराक्रमाच्या,व विशेष गौरवार्थ देण्यात आल्याने त्यावर त्यांचाच मालकी हक्क आहे.आज काळ आणि संदर्भ बदलले असले तरी त्या काळातील जमिनीवर नजराणा आकारण्याचा वर्तमान सरकारला कुठलाही अधिकार नाही.एका अर्थाने त्या काळी सरकारने केलेला गौरव आजचे सरकार नाकारत आहे.हे इनामे सात प्रकारची होती.१,२,३ या शासन मालकीच्या जमिनी पूर्वी वर्ग १ च्या गणल्या जात होत्या.व ती वतने परंपरेने गणली जात होती.नंतर त्यावर निर्बंध येऊन ती विकण्यास प्रतिबंध घातले गेले.१९२९ पासून वतने खाली व्हायला लागली.उत्तोरोत्तर ती कमी होत गेली.देश १९४७ साली स्वतंत्र झाल्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी स्वतंत्र महसूल खात्याची स्थापना करण्यात आली.महसूल अधिनियम अस्तित्वात आला.त्यातून ७/१२ उतारे तयार झाले.वर्ग दोन जमिनीच्या मालकांना कर्ज घेता येत नाही.तारण,दान,गहाण, आदी सारखे काही व्यवहार करता येत नाही.२००२ ला शासन निर्णय होऊन त्या जमिनी ७५ टक्के नजराणा भरून घेऊन वर्ग १ करण्यात आल्या.२०१८ ला दुसरा निर्णय घेऊन आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.२०१९ साली ते प्रांत व तहसीलदारांना देण्यात आले.आता ५० टक्के नजराणा भरून घेऊन या जमिनी वर्ग १ मध्ये वर्ग करण्यात येत आहे हा या शेतकऱ्यांवर अन्याय असून या बाबत आपण शेतकाऱ्यांबरोबर राहू असे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.त्याचे शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.
या वेळी उच्च न्यायालयाच्या लढ्यात ऍड अजित काळे यांचे योगदान कालवा कृती समिती कधीही विसरणार नसल्याचे कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी म्हटले आहे.
यावेळी कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,नानासाहेब गाढवे,कौसर सय्यद,गोपाळा सोनवणे,सोमनाथ दरंदले,अनुसभाई शेख आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक उत्तमराव जोंधळे यांनी केले तर सुत्रसंचलन संजय गुंजाळ यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नवनाथ शिरोळे यांनी मानले.या वेळी अड.अजित काळे,अड .वैभव देशमुख यांचा सत्कार जेष्ठ नेते पावलंस कोळगे यांनी शाल,हार,श्रीफळ देऊन गौरव केला.