नगर जिल्हा
शिर्डीत साई संस्थानच्या ध्यान मंदिराचे उदघाटन उत्साहात संपन्न
कोपरगाव(प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने मंदिर परिसरातील साई सत्यव्रत हॉलचे पहिल्या मजल्यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचे उदघाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
साई संस्थानने नुकतेच साई सत्यव्रतच्या पहिल्या मजल्यावर चाळीस लाख रुपये खर्चाच्या ध्यान मंदिराची घोषणा केली होती.त्याचे उदघाटन नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले . यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त अॅड.मोहन जयकर, माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, विश्वस्त तथा नगराध्यक्षा श्रीमती अर्चना कोते,नलिनी हावरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.हावरे म्हणाले की, जगाच्या व देशाच्या कानाकोप-यातुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डी येथे येतात. यामुळे शिर्डी ही नेहमी गजबजलेली असते. अशा या गजबलेल्या ठिकाणी ज्या साईभक्तांना १० ते १५ मिनिटे ध्यान करुन मानसिक शांतता, स्थर्ये व बाबांची अनुभूती मिळावी याकरीता शांततामय अशी जागा नव्हती. त्यामुळे साईभक्तांकडून अनेक दिवसांपासुन ध्यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरातील साई सत्यव्रत हॉलचे पहिल्या मजल्यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन २७०० चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ असलेले ध्यानमंदिर उभारण्यात आलेले आहे. या ध्यानमंदिराचा शेकडो साईभक्त दररोज लाभ घेवू शकतील. हे ध्यानकेंद्र साऊंड प्रुप व वातानुकुलित ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी शांतता निर्माण होवून भक्तांना ध्यान करता येईल असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.