नगर जिल्हा
राहुरी विद्यापीठ येथे महात्मा फुले यांना अभिवादन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे “महात्मा” दिनानिमित्त श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यानां अभिवादन केले आहे.
या महात्मा दिनाच्या अनुषंगाने श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य वतीने महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही महात्मा दिनानिमित्त महात्मा फुलेंना अभिवादन करण्याबरोबरच महात्मा फुले लिखित शेतकर्याचा असुड,गुलामगिरी,छत्रपती शिवरायांचा पोवाडा,ब्राह्मणाचे कसब,आदी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
दि.११ में १८८८ रोजी जोतिराव फुले यांना मुंबईतील कोळीवाडा येथे दुसरे समाज सुधारक रावबहादुर वडेकर,कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे,दामोदर यंदे, तेलगू नेते स्वामी रमय्या वैकंय्या आय्यावारु,मोरो विठ्ठल वाळवेकर,यांच्या पुढाकाराने रघुनाथ महाराज सभागृहात सोहळा आयोजित करून अठरापगड जाती जमातीच्या साक्षीने जोतिराव फुले यांचा सत्कार करून “महात्मा” पदवी असलेले मानपत्र अर्पण केले हा दिवस महात्मा दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे महात्मा दिनानिमित्त श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले की, महात्मा फुलेंनी समाजा- समाजातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि आज ११ मे २०२० या दिवशी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (कोविड १९) सुरक्षित अंतर ठेवून महात्मा दिन साजरा करावा लागत आहे.
या प्रसंगी संघाचे राज्य सचिव सुनिल गुलदगड.सल्लागार अजिंक्य मेहेत्रे,जिल्हाध्यक्ष जिवन गुलदगड,राहुरी शहराध्यक्ष रोहित टेंभे, सुरक्षा अधिकारी शेटे व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.अजिंक्य मेहेत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी पोलिस कर्मचारी, डॉक्टर,साफसफाई कर्मचारी,यांना सॅनिटायझरचे वाटप केले आहे.