नगर जिल्हा
सौ.शेख यांचे निलंबन करा-शिक्षक संघटनांची पुन्हा मागणी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी पदावर असताना शबाना शेख यांनी सुडबुद्धितून काम केल्याचा आरोप करीत त्यांना पुन्हा कोपरगाव तालुक्यात लुडबुड करू देऊ नका अशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मागणी करत आज पुन्हा विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधीने काल दिलेल्या बातमीने उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्या बाबत जिल्हा परिषद पातळीवर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु झाल्या असून याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित मानले जात आहे,कोपरगाव पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने हि बाब अवघड राहिलेली नाही.याबाबत शिक्षण विस्तार अधिकरी शबाना शेख यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता तो स्थापीत होऊ शकला नाही.
कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे गटशिक्षण अधिकारी हे स्वतंत्र पद आहे.मात्र या ठिकाणी आपल्या राजकीय सोयीसाठी कायम हे पद रिक्त ठेऊन या ठिकाणी एका महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती करून आता भाजपमध्ये गेलेला एक राजकीय नेता तथा जिल्हा परिषद सदस्य आपले हितसंबंध सांभाळत असल्याचे वारंवार लक्षात आले आहे.हि काही एक दोन वर्षाची गोष्ट नाही गेले पंधरा-सोळा वर्षांपासून याची पुनरावृत्ती होत आहे.त्यामुळे सर्वच शिक्षक संघटना नाराज आहे.गत वर्षी याच शिक्षण संघटनांनी आंदोलन करून कोपरगाव पंचायत समितीतील प्रभारी राज हाकणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख यांची राहाता तालुक्यातील शिर्डी बिटचा कार्यभार घेण्यास भाग पाडले होते.व त्यांची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले होते.मात्र आठ महिन्यात कारवाई तर झाली नाहीच पण त्यांना पुन्हा एकदा मुलांना उन्हाळी ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रम चलचित्र माध्यमातून आणण्याचे निमित्ताने कोपरगाव तालुक्यात शिरकाव केल्याने तालुक्यातील शिक्षकांचा संताप अनावर झाला आहे.त्यातून त्यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन देऊन त्यांच्या चौकशी व कारवाईची विचारणा केली आहे.व त्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे.त्यांचे निलंबन केले नाही तर शिक्षकांना नाईलाजाने शिक्षण विभागाविरुद्ध असहकार पुकारून व्हॉट्सअप ग्रुप मधून बाहेर पडावे लागेल असा इशारा देऊन शबाना शेख यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापक सुभाष सोनवणे यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणीही या संघटनांनी शेवटी केली आहे.या निवेदनावर कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती,अ,जिल्हा प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,कोपरगाव शाखा,अ, नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ,शिक्षक परिषद आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.