गुन्हे विषयक
धोत्रे गाव आज बंद, तणावपूर्ण शांतता

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाब तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंदिरावर अज्ञात इसमांनी दगडांनी हल्ला केल्याने गावातील गावातील शांतता टिकविण्यासाठी रात्री पोलीस प्रशासनाने उशिरा पर्यंत बैठक घेऊनही आज काही हिंदुत्ववादी विचाराच्या तरुणांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासनावर तणाव वाढला असून ही घटना नजीकच्या वस्तीतील लहान खोडकर मुलांकडून घडली असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे.त्यामुळे हा प्रश्न उगीच ताणवण्यात अर्थ नसून सामोपचाराने स्थानिक पातळीवर मिटविणे गरजेचे बनले आहे.
कोपरगाव तालुक्यात राम मंदिर वर्गणी संकलनानंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गणेश मंदिरात काही अज्ञात इसमांनी दगडफेक करून गणेश मंदिरास नुकसान पोहचवले असल्याने गावात अचानक तणाव निर्माण झाला आहे.त्याबाबत घोत्रे येथील सुमारे चार हजार लोकसंख्येच्या गावात ठिकाणी मस्जिद व मंदिर शेजारी-शेजारीच आहे.हे मंदिर साधारण तीस बाय पस्तीस फूट आकारात असून पुढे माजी आ.काळे यांनी आपल्या निधीतून सभामंडप बांधून दिलेला आहे.ही निधी संकलनाची बैठक संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास गणेश मंदिर परिसरात कोणी नाही ही संधी साधत काही समाज कंटकांनी या मंदिरात दगडफेक केली त्यात मंदिराच्या काचा फुटल्या असून खिडक्या,गाभारा यांना क्षती पोहचवली असल्याचे वृत्त आहे.मंदिरातही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचें प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.परिणामस्वरूप ही घटनां परिसरात सामाजिक संकेत स्थळावरून वाऱ्यासारखी पसरली व परिणामस्वरूप ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व एक छोटेखानी बैठक घेऊन या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला असून आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान या घटनेची खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेऊन तेथील गावातील जाणत्या नागरिकाची,जेष्ठ ग्रामस्थांची तातडीची बैठक रात्री १०.३० पर्यंत घडवून आणली असून या असामाजिक तत्वांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.गावात तणावपूर्ण शांतता आहे.काही तरुणांनी गुन्हेगारांना जो पर्यंत पोलीस पकडत नाही तो पर्यंत आपण ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली असल्याचे होती.या प्रकरणी पोलीस पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
आज सकाळीही या घटनेचे पडसाद उमटले असून काही तरुणांनी या घटनेच्या निषेधार्थ गावबंदचे आवाहन केले असून ग्रामस्थ व व्यापारी यांनी बंद पाळला असल्याची बातमी आहे.घटनास्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान याच गावात मुस्लिम समाज अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने रहात असुन तो पस्तीस टक्के आहे.मात्र गावात जातीय सलोखा बऱ्यापैकी असला तरी या गावाला साडेसाती लागल्याचे दिसत आहे.पोलीस निरीक्षकपदी अनिल कटके असताना काही महिन्यांपूर्वी काही नागरिकांनी एका महापुरुषांचा पुतळा रातोरात बसवून प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता त्यानंतर काही महिन्यात ही दुसरी घटना घडली असली तरी याला जातीय कंगोरा दिसत नसल्याचे खात्रीलायक वृत्त असले तरी पोलिसांना यातील दोषी शोधण्याचे मात्र आव्हान निर्माण झाले आहे.त्यामुळे येथे पोलिसांना अधिकचे लक्ष पुरविण्याची जबाबदारी येऊन पडली असल्याचे दिसत असून या असामाजिक तत्वांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.