शैक्षणिक
रूग्णांचा उपचार करतांना तंत्रज्ञानाबरोबर मानवी संवेदना आवश्यक-आवाहन
न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
‘‘वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आपण कितीही तंत्रज्ञानाचा वापर करत असलो तरी आपल्या कामात मानवी संवेदना आवश्यक आहेत. रूग्णांचा उपचार करतांना आपुलकी, संवादाचे नाते ठेवावे.डॉक्टर ईश्वराचे रूप असते.ही भावना सतत मनात ठेवत रूग्णांचा उपचार करा.’’असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोणी येथे वैद्यकीय पदवीधारक विद्यार्थ्यांना नुकतेच केले आहे.
‘‘सध्याच्या काळात वैद्यकीय,माहिती-तंत्रज्ञान,संगणक विज्ञान,कृत्रीम बुध्दीमत्ता हे क्षेत्र एकमेकाला पुरक आहेत.तेव्हा विद्यार्थ्यांनी वैद्यकीय ज्ञानाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा’’-प्रभाकर काळे,कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या अभिमत विद्यापीठाचा १७ वा दीक्षान्त पदवीदान समारंभ लोणी येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बिर्ला बोलत होते.
सदर प्रसंगी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे,कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे,कुलसचिव अरूण कुमार व्यास,व्यवस्थापन समिती सदस्य एम.एम.पुलाटे,सुवर्णा विखे,मोनिका सावंत-इनामदार,डॉ.वाय.एम.जयराज,कल्याणराव आहेर,अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आदी उपस्थित होते.
लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला म्हणाले की,‘‘दररोज गतीने बदलणाऱ्या तंत्राच्या युगात मेडिकल सायन्स मधील विद्यार्थी व संशोधकांना आता आरोग्यावर परिणाम करणारे वातावरणीय बदल, स्वच्छ पाणी याविषयांत सुध्दा अभ्यास, संशोधन करण्याची गरज आहे.वातावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या नवीन रोगांवर प्रभावी उपचार पध्दती शोधण्याचे काम ही मेडीकल सायन्स मधील विद्यार्थी, संशोधकांनी करावे.’’
‘‘भारत देश तंत्रज्ञान,कृषी,नवीन स्टार्टअप,औद्यागिक,सेवा अशा अनेक क्षेत्रात गतीने प्रगती करत आहे.अनेक क्षेत्रात तर भारत जगाचे नेतृत्व करत आहे.विकसित भारत बनविण्याची मोठी जबाबदारी तरूणांवर आहे.नवीन ऊर्जा, सामर्थ्य, नवीन संकल्प ठेवून तरूणांनी नवीन विकसित भारतासाठी काम करावे.’’ असे आवाहन ही श्री.बिर्ला यांनी शेवटी केले आहे.
कुलपती राजेंद्र विखे म्हणाले,‘‘वैद्यकीय क्षेत्रात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.कोवीड काळात आरोग्याचे महत्त्व अधोरेखीत झाले.तेव्हा वैद्यकीय व्यावसायिकांपुढे बदलत्या काळात उपचार करण्याबरोबरच नवीन संशोधन करण्याचे आवाहन आहे.वैद्यकीय व्यावसायिकांनी ग्रामीण भागात आपली सेवा द्यावी.’’
यावेळी वैद्यकीय पदवी,पदव्युत्तर पदवीधारक व विद्यावाचस्पती (पीएचडी) विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याहस्ते शौर्यकुमार सिंह,सागर कादेकर,मेहक जैन,शेजल नाईकवडी,दीपांशी यादव या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि वंदना पुलाटे,भारत होंडे यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली.कुलगुरू व्ही.एन.मगरे यांनी प्रवरा अभिमत विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.भारतीय राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आहे.