आंदोलन
शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करा या मागणीसाठी कोपरगावात आंदोलन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावसह राज्यात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम मोठ्या उत्साहात सुरु झाला असून या साठी विद्युत पंपासाठी महावितरण कंपनीची मात्र रात्री आज पूरवठा करत असून हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याने या विरोधात कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दि.२ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी एक दिवसीय ‘लाक्षणिक उपोषण’ करूनही महावितरण कंपनीने अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत या निषेधार्थ दि.०२ जानेवरी रोजी महावितरण कंपनीच्या कोपरगाव कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा उद्धव शिवसेना नेते प्रवीण शिंदे व मनोज कपोते यांनी दिला आहे.
“सर्व शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा ३ फेज वीज पुरवठा पूर्ण दाबाने करण्यात यावा,मौजे ब्राम्हणगाव येथील मंजूर विद्युत उपकेंद्रांचे काम करण्यात यावे,कोपरगाव तालुक्यातील सर्व वीज उपकेंद्रावरील नवीन रोहित्र उच्चदाब क्षमतेचे त्वरित बसवून ते कार्यान्वित करावे,जून २०२१ ते ऑक्टोबर २०२१ तसेच जुन २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंतची अतिवृष्टीमुळे पंप बंद राहिल्यामुळे शेती पंपाची वीज बिल माफ करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
अ,नगर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात आहे.शेती जगवण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी देत आहेत.एकीकडं राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे.रक्त गोठवणारी थंडी पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.तर दुसरीकडं सरपटणाऱ्या व वन्य प्राण्यांचा धोका आहे.अशा स्थितीत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री जंगली श्वापदापासून संरक्षणासाठी शेतात पहारा द्यावा लागत आहे.याबाबत सत्तेत येणारे राजकारणी कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.विरोधात असल्यावर आकंठ ओरडून शेतकऱ्याचा समस्या मांडताना दिसणारे राजकारणी सत्तेची ऊब मिळताच शेतकऱ्यांच्या मांगण्याना कोलदांडा घालताना दिसत आहेत.त्यामुळे आता शेतकरी सजग होत असून त्या विरोधात त्यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.या विरोधात कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रण पेटविण्याचा निर्णय घेतला होता.त्यातुन कुंभकर्णी सरकारला जागे करण्याचा हा पवित्रा असल्याचे मानले जात आहे.त्यांनी या पूर्वी दि.०२ डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण केले मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर मागण्या कळवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी पुढील दिशा ठरवली आहे.व हे संतप्त शेतकरी आगामी ०२ जानेवारी पासून,’आमरण उपोषण’ करणार असल्याचा इशारा उद्धव शिवसेना नेते मनोज कपोते,प्रवीण शिंदे यांनी शेवटी दिला आहे.
दरम्यान या आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यानीं मोठ्या संख्येने उपस्थित राहवले असे आवाहन तुषार विध्वंस,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी केले आहे.आता यावर महावितरण कंपनी कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.