धार्मिक
शिर्डीत नियमित दर्शन सुविधा सुरु करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असून दर्शनासाठी केवळ ऑनलाईन सुविधाच उपलब्ध असल्यामुळे असंख्य भाविकांना साईबाबांचे दर्शन न घेताच परतावे लागत आहे.त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी ऑफलाईन दर्शन सुविधा सुरु करावी व बंद असलेले भोजनालय सुरु करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या पत्रात नुकतीच केली आहे.
“शिर्डीत दर्शनासाठी केवळ ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे हि ऑनलाईन किचकट प्रणाली सर्व सामान्य असंख्य साई भक्तांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून अनेक साई भक्तांना दर्शनासाठी हजारो किलोमीटरवरून येऊन देखील साईबाबांचे दर्शन मिळत नाही.त्यामुळे साईभक्त निराश होत आहेत.त्यावर परिवर्तन होणे गरजेचे आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईसंस्थान शिर्डी.
दिलेल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सर्वच देवस्थानाबरोबरच देश-विदेशातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी मध्ये देखील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.मात्र दर्शनासाठी केवळ ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे हि ऑनलाईन किचकट प्रणाली सर्व सामान्य असंख्य साई भक्तांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून अनेक साई भक्तांना दर्शनासाठी हजारो किलोमीटरवरून येऊन देखील साईबाबांचे दर्शन मिळत नाही.त्यामुळे साईभक्त निराश होत आहेत. तसेच ऑनलाईन दर्शन पास प्रणालीत मोठ्याप्रमाणात काळाबाजार होत असल्याचे साई भक्तांमधून बोलले जात असून त्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.शिर्डीत साई भक्तांची होत असलेली गर्दी व या भाविकांना भोजनालयातून मिळणारे भोजन भोजनालय बंद असल्यामुळे मिळत नाही. त्यामुळे साई भक्तांचे हाल होत आहेत.
नुकतीच दिवाळीची सुट्टी संपली आहे तरी देखील शिर्डीत साई भक्तांची झालेली गर्दी दर्शन नियोजनात लवकरात लवकर बदल करण्याचे संकेत देत आहे.पुढील महिन्यात येणारा नाताळ सण व दरवर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभी साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी यावर्षी देखील मोठ्याप्रमाणात होणार आहे.त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला साई बाबांचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी ऑफलाईन दर्शन सुविधा सुरु करावी व भोजनालयातून देण्यात येणारे भोजन साई भक्तांना मिळावे यासाठी बंद असलेले भोजनालय तातडीने सुरु करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.काळे यांनी शेवटी केली आहे.