आरोग्य
कोपरगावात कोविड हॉस्पिटलचे उद्या लोकार्पण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जीवघेण्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून बांधण्यात आलेल्या ५० बेडच्या कोविड रुग्णालयाचे व प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते माजी आ. अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार (दि.८) रोजी दुपारी ३.०० वाजता होणार असल्याची माहिती आ.काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी कोपरगाव पालिकेच्या हद्दीतील ग्रामीण रुग्णालयांतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम वेगाने पूर्ण झाले आहे. सुमारे १० मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती या प्रकल्पांमधून होणार आहे. प्रकल्पांसाठी शेड बांधण्यासह विविध कामे नुकतेच पूर्ण झाले आहे.त्याचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आ.काळे यांनी श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात १०० ऑक्सिजन खाटांचे व १२० सिलेंडर प्रतिदिन उत्पादन (३५ एन.एम.) क्षमतेचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व ५०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारून व आरोग्य विभागासाठी आवश्यक साधन सामुग्री व साहित्याचा पुरवठा केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले व कोरोनाच्या पहिल्या लाटेला परतावून लावले आहे.त्यानंतर आलेली दुसरी लाट मोठ्या प्रमाणात घातक होती.त्यावेळी ऑक्सिजन व ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत होती व आरोग्य विभागाकडून देखील कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी भविष्यात येणाऱ्या संकट ओळखून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात विस्तारित ५० बेडचे कोविड हॉस्पिटल व ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेऊन तातडीने काम सुरू केले होते.हे काम नुकतेच पूर्ण झाले असून कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी ५० बेडचे कोविड रुग्णालय व प्राणवायू प्रकल्प सज्ज झाला आहे.त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची कायमस्वरूपी सोय होणार असून या ५० खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री ना. मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आ.काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.