कोपरगाव तालुका
घरकुल जागेच्या खरेदीसाठी वाढीव रकमेची केली मागणी-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक शासनाच्या विविध विभागांच्या जागेवर वास्तव्य करीत असून ज्या नागरिकांना घरकुल मंजूर झाले मात्र घरकुलासाठी जागा खरेदी करण्यात मिळत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम कमी पडत असल्यामुळे याबाबत शरद पवार,ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून घरकुलाच्या जागेसाठी जास्तीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
शेती महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत.या जमिनी या ग्रामपंचायतींना देवून त्या जमिनीचा महसूल समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीने शासनास जमा करून ती जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करता येईल का याबाबत प्रयत्न सुरु आहे.या उपलब्ध झालेल्या जागेतून गाव विस्तारीकरण करण्यास मदत होईल-आ.आशुतोष काळे.
ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती कोपरगाव यांच्या वतीने कृष्णाई मंगल कार्यालय येथे आयोजित महाआवास कार्यशाळेमध्ये विविध लाभार्थ्यांना यामध्ये पंतप्रधान आवास योजना ५०० लाभार्थी, रमाई आवास योजना २५९ लाभार्थी,२०० बचत गटांना २ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरण व शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेतून हर घर गोठा अभियानातून १००० गोठ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्र आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मागील चार वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून रस्ते,घरकुल,अंगणवाड्या,शाळा खोल्या दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात मार्गी लावल्या आहेत.ग्रामीण भागाच्या सर्व समाजातील व सर्वच घटकातील नागरिकांना सामुहिक व व्यक्तिगत विकासाचा लाभ मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सभापती,उपसभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य यांनी करून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काही गावात वनविभाग,पाटबंधारे आदी विविध खात्यांच्या जमिनी असून संवत्सर,वारी,कोकमठाण याठिकाणी शेती महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत.या जमिनी या ग्रामपंचायतींना देवून त्या जमिनीचा महसूल समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीने शासनास जमा करून ती जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करता येईल का याबाबत प्रयत्न सुरु आहे.या उपलब्ध झालेल्या जागेतून गाव विस्तारीकरण तसेच त्या जागेवर गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या मदतीने पाझर तलाव खोदुन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लावण्यासाठी मदत होईल व काही ठिकाणी गावठाणच्या माध्यमातून या जागेवर घरकुल बांधण्यासाठी देखील जागा उपलब्ध होण्यास मदत होणार असून संवत्सर,वारी,कान्हेगाव,कोकमठाण ग्रामपंचायतीने याबाबत प्रस्ताव पाठवावे त्याबाबत आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले असून महिलांनी त्या कर्जाचा योग्य विनियोग व्यवसायासाठी करून आपले प्रपंच आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवन,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने,सोनाली साबळे,सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्या अनुसया होन,रोहिदास होन,राहुल रोहमारे,राहुल जगधने,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपगटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,पंचायत समिती कृषी अधिकारी पंडित वाघिरे तसेच तालुक्यातील सरपंच,ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते.