कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरातील विकास कामांना पुन्हा खीळ-पहाडेंचा आरोप
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या कोल्हे गटाने पुन्हा एकदा आपला नकारात्मक दृष्टिकोन दाखवून दिला असून अनेक विकास कामांना स्थगिती देऊन आपली मूळ ओळख दाखवून दिली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य मंदार पहाडे यांनी केली आहे.त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीचा शिमगा सुरु झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत भाजप तथा कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आता याबाबत लगेच बोलणे उचित नाही याबाबत आम्ही उद्या पत्रकार अपरिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे त्यामुळे याबाबत नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.
कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच नगरपालिका सभागृहात संपन्न झाली असून या बैठकीत सत्ताधारी गटाचे पदाधिकारी व नगराध्यक्ष विजय वहाडणे आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत भाजपच्या कोल्हे गटाने आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे श्रेय वहाडणे गटास मिळू नये यासाठी हि पाचर मारल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादीचे नगरसेवक पहाडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात बोरावके यांनी पुढे म्हटले आहे की,”या निवडणुकीपुरते राजकारण व निवडणूक संपल्यावर विकासकारण या राष्ट्रवादीच्या विचारातून राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी कोपरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देत नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच सत्ताधारी नगरसेवकांना सहकार्य केले आहे.मात्र ज्यांना सदासर्वदा राजकारण करायचे आहे त्या सत्ताधारी विरोधकांनी विकासकामांच्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थगिती देवून कोपरगाव शहर विकासाला खीळ घातली आहे.
कोपरगाव शहराच्या सर्वच प्रभागातील विविध विकास कामांच्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीची नुकतीच सभा घेण्यात आली.या सभेत कोपरगाव शहरातील प्र.क्र.२ मध्ये बोरावके घर ते आढाव घर रस्त्याचे खडीकरण करणे व भुयारी गटार बांधकाम करणे,तसेच येवला रोड भागातील नगरपरिषद शाळा,छत,कोबा आणि वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंट करणे,प्र.क्र.३ मधील बाळासाहेब सातभाई जलकुंभ ते महाजन वखार ते जगन्नाथ सोनवणे घर भुयारी गटार बांधकाम,येवला नाका ते मार्केट यार्ड,मार्केट यार्ड ते आण्णाभाऊ साठे चौक रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, प्र.क्र.६ मध्ये एस.जी.विद्यालय ते हेम मेडिकल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व साईड पट्ट्यांना पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अहिंसास्तंभ ते आठरे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व साईड पट्ट्यांना पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्र.क्र.७ मध्ये मच्छिंद्र उज्जैनवाल घर ते रीळ घर परिसर रस्त्यास पेव्हिंग ब्लॉक बसविणे,हसन कुरेशी घर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्यास पेव्हिंग ब्लॉक बसविणे,प्र.क्र. ११ मध्ये गांधीनगर भागातील पुरुष सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे,प्र.क्र. ११ पगारे घर ते जोगदंड घर भुयारी गटार बांधकाम करणे आदि विकास कामांच्या निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आल्या होत्या.तसेच कोपरगाव नगरपरिषद हद्दीत उद्यान विकसित करणे व खेळणी साहित्य बसविणे,भारतीय बैठक पद्धतीचे जैविक शौचालय (एफ.आर.पी. बायो टॉयलेट) उभारणी करणे, कोपरगाव नगरपरिषद मालकीचे उंच जलकुंभ व संप हाऊसची साफ सफाई करणे आदी कामे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
सर्व निविदांना मंजुरी मिळून शहरात विकास कामे सुरु होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र शहर विकासाशी घेणं देणं नसणाऱ्या सत्ताधारी विरोधकांनी निविदा मंजूर करण्यासाठी स्थगिती देवून कोपरगाव शहराचा विकास न करण्याची मानसिकता दाखवून दिली आहे. विकासकामांना खीळ घालण्याची त्यांची सवय जुनीच असून परमेश्वर त्यांना कोपरगाव शहराचा विकास करण्याची सद्बुद्धी देवो असे नगरसेवक मंदार पहाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.