कोपरगाव तालुका
शेतकऱ्यांनी कृषी योजनेचा लाभ घ्यावा –सभापती अनुसया होन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजातील घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविला जात असून यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून या योजनेचा गरजू लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
नगर जिल्हा परिषद,पंचायत समितीच्यामाध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आमचे राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून गरजूंना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंपसंच, वीज जोडणीसाठी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच खरेदीसाठी, परसबाग, तसेच पी. व्ही.सी.किंवा एचडीपीई पाईप लाईनसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते. चालू आर्थिक वर्ष२०१९ /२० डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने साठी रुपये निधी प्राप्त झाला असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमाती नवबौध्द शेतक-यांचे उत्पादन वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या शेतक-यांना निधी दिला जातो. अनुसूचित जमाती व नवबौद्ध शेतक-यांना व आदिवासी जमातीतील शेतकरी बांधवाना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.या योजनांचा लाभ तालुक्यात पोहोचला असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सर्व अनुसूचित जमाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना सक्षम करणार असल्याचे सभापती अनुसया होन यांनी शेवटी म्हटले आहे.