धार्मिक
कोपरगावात नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील सर्वच मंदिरे अजूनही बंदच आहेत. कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या निवारा-सुभद्रानगर परिसरातील भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्री सप्तशृंगी माता मंदिराचा नवरात्रौत्सव व वर्धापन दिन व धार्मिक विधीचे साध्या पद्धतीने आयोजन केल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समिती प्रमुख सुहासिनी कोयटे व साई निवारा मित्रमंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली आहे.
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
धार्मिक दृष्टीने नवरात्रौत्सवाला अधिक महत्व असल्यामुळे सर्व धार्मिक परंपरा जोपासत निवारा-सुभद्रानगर परिसरात सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्र उत्सव व वर्धापन दिन साध्या पद्धतीने शासकीय निर्देशांचे पालन करत होणार असून १७ ऑक्टोबर पासून प्रथेप्रमाणे सर्व परंपरा जोपासत नऊ दिवसात मंदिरातील घट स्थापना नित्य आरती, सप्तशती पाठ, होम-हवन अभिषेकासाठी मंदिरातील पुजारी, सोहळ्याचे मानकरी यांच्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे तसेच सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे साई निवारा मित्र मंडळाचे वतीने सांगण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे उलंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घेत कोरोना या विषाणूजन्य रोगाला हरविण्यासाठी सर्वांनी सुरक्षित अंतराचे पालन,तोंडाला मास्क लावणे व हात स्वच्छ धुणे बंधनकारक असून नवरात्रोत्सवात परिसरातील नागरिकांनी तसेच कोपरगाव शहरातील काळजी घ्यावी असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती प्रमुख सौ. कोयटे व साई निवारा मित्रमंडळाचे अध्यक्ष,नगरसेवक कदम यांनी शेवटी केले आहे .