कोपरगाव तालुका
शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्या-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पढेगांव, करंजी, संवत्सर, कासली, शिरसगांव,तळेगावमळे, उक्कडगांव, आपेगांव, घोयेगांव, गोधेगांव, लौकी, दहेगावबोलका, धोत्रे, खोपडी,भोजडे, कान्हेगाव, वारी, सडे या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे.
नुकसानीची तिव्रता मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देताना श्री परजणे यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पढेगांव, करंजी, संवत्सर, कासली, शिरसगांव,तळेगावमळे, उक्कडगांव, आपेगांव, घोयेगांव, गोधेगांव, लौकी, दहेगावबोलका, धोत्रे, खोपडी,
भोजडे, कान्हेगाव, वारी, सडे या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. सुमारे दोन तासाहून अधिक वेळ झालेल्या या पावसामुळे शेतातील उभी पिके मका, कपाशी, सोयाबीन, भईमूग, बाजरी, तूर, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी सोंगणी करुन शेतात पडून असलेली मूग, सोयाबीन व बाजरीची पिके पाण्याखाली भिजून गेली आहेत.पाऊस आणि वादळ इतके वेगात होते की, त्यामुळे ऊसासारखी मजबूत पीके देखील अक्षरशः आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडी, पत्र्यांची घरे, झोपड्या, विजेचे खांब देखील कोलमडून पडले आहेत.
यावर्षी गेल्या सहा – सात महिन्यांपासून कोरोना संसर्गाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत यावर्षी सुरुवातीपासून झालेल्या शेतीला उपयुक्त अशा पावसाने खरीपाची पिके चांगली आलेली होती. याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत होते. आर्थिक संकटातून वाचता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असतानाच रविवारी सायंकाळी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात अचानक ढगफुटी सदृष्य वादळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या आशेवर अक्षरशः पाणी फिरले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या नैसर्गिक आपत्तीची शासनाने तातडीने दखल घेवून नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्री महोदयांनी जातीने लक्ष घालावे अशीही मागणी श्री परजणे यांनी शेवटी केली आहे.