शैक्षणिक
नव उद्योजकांसाठी वर्तमानात मोठी संधी-बनकर

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“ग्रामीण भागातील समस्या हीच नवउद्योजकांसाठी वर्तमानात मोठी संधी असून,स्थानिक गरजा ओळखून शेतीला पूरक व्यवसाय उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एन.डी.बी.एग्रोचे संचालक चेतन बनकर यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

"महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता,नवोपक्रम आणि स्टार्टअपची संस्कृती विकसित व्हावी,यासाठी महाविद्यालयाचा स्टार्टअप अँड इंनोव्हशन सेल सातत्याने विविध उपक्रम,व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करीत असतो"- विजय ठाणगे,प्राचार्य, के.जे.सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव.
स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेल हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था,महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये नवीन कल्पनांना,संशोधनाला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते.कोपरगाव येथील स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, स्टार्टअप अँड इंनोव्हशन सेल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन,इन्क्यूबेशन अँड एंटरप्रायसेस यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्टार्टअप टॉक सिरिज 2.0 अंतर्गत ‘ग्रामीण भागातील व्यवसायाच्या संधी’ या विषयावर आयोजित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे होते.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.सदाशिव नागरे,डॉ.बाळासाहेब गायकवाड,प्रा.प्रदीप शेलार,प्रा.वैष्णवी मगर इंनोव्हशन सेलचे प्रमुख डॉ.शंकरय्या कोंडा,डॉ.निलेश पोटे,प्रा.सदाशिव नागरे,डॉ.बाळासाहेब गायकवाड,प्रा.प्रदीप शेलार,प्रा.वैष्णवी मगर आदीसह प्राध्यापक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतमाल व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विकण्याऐवजी तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू केल्यास रोजगार निर्मितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांकडे केवळ समस्या म्हणून न पाहता त्यातून व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत.शेतीमालाचे मूल्यवर्धन,प्रक्रिया,योग्य पॅकेजिंग आणि थेट ग्राहकांपर्यंत विक्री यावर भर दिल्यास व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात.विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारून इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा” असे आवाहनही शेवटी त्यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.नामदेव ढोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.चंचल विभुते,प्रा.कीर्ती वाकचौरे यांनी केले आहे तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.नीलेश पोटे यांनी मानले आहे.



