कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात आणखी दोघे संशयित ताब्यात !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोनो रुग्णांची संख्या नुकतीच थांबलेली असताना आज पुन्हा दोन संशयित नागरिक आरोग्य विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना नगर येथे धाडण्यात आले आहे.मात्र या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र ती माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.मात्र तालुका दंडाधिकाऱ्यानी त्यास दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता या ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या तपासणीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आतापर्यंत एक वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,आशा सेवक महिला यांच्या मार्फत केलेल्या बारा पथकांनी ७ हजार ०३२ कुटुंबातील ३४ हजार ८०० नागरिकांची तपासणी केली असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
कोरोना या विषाणूची राज्यात आज अखेर हि संख्या ८ हजार ५९० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.कोपरगाव तालुक्यात या आधीच दोन महिलांचे बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात हे दोन संशयित रुग्णापैकी एक करंजी तर दुसरा हा माहेगाव देशमुख येथील असल्याचे समजते.त्यामुळे प्रशासनात व नागरिकांत काळजीचा सूर उमटला आहे.
कोपरगाव तालुक्यात पहिल्या दोन महिलांचा अपवाद वगळता कोरोनाची लागण झालेले आणखी रुग्ण सुदैवाने आढळले नाही. हि समाधानाची बाब आहे.मात्र हे चित्र आगामी काळात असेच ठेवण्याचे मोठे आव्हान तालुका प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.नजीकचे येवला व मालेगाव,संगमनेर हे कोरोनाचे मोठे केंद्र विकसित होण्याची भीती निर्माण झाली आहे.व या नागरिकांचा बऱ्याच वेळा कोपरगाव शहराशी संपर्क येत असतो.त्यामुळे आता प्रशासनासोबतच नागरिकांना सावधानता बाळगावी लागणार आहे.
दरम्यान कोपरगाव येथे एका हॉटेल मध्ये ठेवण्यात आलेले व कोरोना चाचणीत सकारात्मक व नकारात्मक आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व परदेशातून आलेल्या नागरिकांना आता संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.या रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विविध सामाजिक संस्था जेवण नाश्ता पूरवित आहेत.कोपरगाव तालुक्यातुन आज अखेर ५७ जणांना कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते.या पैकी मयत बाधित महिला वगळता सर्व अहवाल नकारात्मक आले आहेत. कोपरगाव येथील संस्थात्मक देखरेखीमधुन १९ जणांना सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. आता त्यात आणखी १३ जण असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.