हवामान विभाग
शेतकऱ्यांना न मानवणारा अवकाळीचा तडाखा !

न्यूजसेवा
कोपरगाव -( प्रतिनिधी)
महाराष्ट्रात सध्या मेघ गर्जनेसह होणारा वादळी पाऊस आणि गारपिट यांनी थैमान घातले आहे. अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे.पश्चिमी विक्षोभ म्हणजे भुमध्य समुद्र, कस्पियन समुद्र तसेच काळा समुद्र या पश्चिमेकडील भागातून अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

जगभरात हरीतगृह उत्सर्जन परीस्थितीमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे.त्याचा परिणाम म्हणून हवामानात बदल होऊन मान्सुन पॅटर्न मध्ये मोठा बदल होत आहे.पावसाळ्यात होणारी अतिवृष्टी,ढगफुटी आणि इतर वेळी होणारा बिगरमोसमी अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिट हे त्याचे दृश्य स्वरुप असल्याचे मानले जात आहे.
वास्तविक यापुर्वी हा पाऊस उत्तर भारतातील काश्मीर, हिमाचल प्रदेश,पंजाब मध्ये मार्च,एप्रिल महिन्यात पडत होता.परंतु महाराष्ट्रातील तापमान २०१७ पासुन सरासरी पेक्षा वाढत असल्याने सदरचे बाष्पयुक्त वारे अलिकडच्या काळात हळूहळू महाराष्ट्राकडे खेचले जात आहेत.वाढत्या तापमानामुळे भविष्यातही या अवकाळी पावसाचा सामना करावा लागेल.महाराष्ट्रातील तापमान बहुतांश भागात ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किंबहुना त्यापेक्षाही जास्त झाल्याचे दिसून येत आहे.

दि.३० मार्च २०२६ झालेला अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिट यामुळे फळबागा इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता १ ते ५ एप्रिल २०२६ पर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट आहे. विशेषतः २ एप्रिल रोजी दुपारनंतर अहिल्यानगरला तसेच संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली भागात या अवकाळी पावसाची सर्वाधिक व्याप्ती असणार आहे. ताशी ५० कि.मी.वेगाने वाहणारे वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपीट यामुळे नुकसानीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल. नाशिक जिल्ह्यातही हीच परिस्थिती असेल.३,४ आणि ५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची तिव्रता हळूहळू कमी कमी होत जाऊन त्यानंतर उघडीप होईल.परंतू १७ एप्रिल तसेच २७ एप्रिलच्या मागेपुढे अवकाळी पावसाचे पुन्हा आगमन होईल असे चित्र आहे. ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे, त्या भागात दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतो. अर्थात या पावसाची विस्तार आणि तिव्रता कमी असते. हरीतगृह परीस्थितीमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून हवामानात बदल होऊन मान्सुन पॅटर्न मध्ये मोठा बदल होत आहे. पावसाळ्यात होणारी अतिवृष्टी, ढगफुटी आणि इतर वेळी होणारा बिगरमोसमी अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिट हे त्याचे दृश्य स्वरुप आहे. शक्य असेल तेथे वेळीच शेतमाल काढणी तसेच सुरक्षित ठिकाणी ठेऊन कमीतकमी नुकसान होईल याचे नियोजन करणे अपरिहार्य आहे.
उत्तमराव निर्मळ,माजी कार्यकारी अभियंता,
जलसंपदा विभाग.



