रेल्वे सेवा
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग थेट असावा-…या खासदारांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर- संगमनेर (अकोले)-नारायणगाव-मंचर-चाकण मार्गे थेट नाशिक-पुणे जोडणी करावी अशी ठाम मागणी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नुकतीच केली आहे.त्यावेळी त्यांचे समवेत खा.राजाभाऊ वाजे,खा.अमोल कोल्हे,खा.भास्कर भगरे आदी मान्यवर होते.

दरम्यान या राड्यात दुष्काळी भागाला जोडणारा जवळके मार्गे नाशिक ते शिर्डी हा रेल्वे मार्ग पुण्याला आणि मुंबईला जाण्यासाठी साईभक्तांसाठी सर्वात जवळचा ठरणार असल्याने त्यासाठी दुष्काळी गव्हाणी सप्टेंबर मध्येच ग्रामसभांचा ठराव घेतलेला आहे.त्यामुळे हा मार्ग रद्द होऊ नये अशी आग्रही मागणी रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य नानासाहेब जवरे यांनी केली आहे.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग मूळ प्रस्तावाप्रमाणे अकोले तालुक्यातूनच जावा तसेच शहापूर-अकोले-शिर्डी रेल्वे मार्ग व्हावा या मागणीसाठी आज मंगळवारी अकोले शहरात बंद पाळण्यात आला तसेच या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर अकोले येथून मोर्चा नेण्यात आला.रेल्वेच्या प्रश्नावरून अकोल्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत.पक्षभेद बाजुला ठेऊन कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत.या मार्गावरून मोठे रणकंदन होत आहे.या पार्श्वभूमीवर खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कानावर घातल्या आहेत.सदर प्रसंगी त्यांचे समवेत नाशिकचे खा.राजाभाऊ वाजे,खा.अमोल कोल्हे,खा.भास्कर भगरे आदी मान्यवर होते.

सुमारे पाच वर्षांपूर्वी महारेलने नाशिक-पुणे या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला तेव्हा हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून जाणार होता.तसेच तालुक्यातील देवठाण येथे रेल्वे स्थानक प्रस्तावित होते.पण नंतर या रेल्वेचा संगमनेर तालुक्यातील मार्ग बदलण्यात आला आणि प्रस्तावतून देवठाण स्थानकासह अकोले तालुका गायब झाला.मूळ सर्व्हेक्षणाप्रमाणे रेल्वे मार्ग व्हावा ही अकोलेकरांची मागणी असून अकोले रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून त्यासाठी आंदोलन सुरू आहे.
दरम्यान या पार्श्वभूमवर खा.वाकचौरे यांनी मंगळवार दि.16 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्रींची भेट घेऊन जनतेच्या भावना प्रत्यक्षरित्या मांडल्या आहेत.या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक,शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र,जी.एम.आर.टी.संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे नमूद केले आहे.



