नगर जिल्हा
गोदावरी कालव्या नजीकची वीज बंद,शेतकरी नाराज !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव,राहाता तालुक्यातील शेती सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोदावरी उजवा व डाव्या कालव्यांना नाशिक जलसंपदा विभागाने नुकतेच दारणा धरणातून बिगरशेती व सिंचनासाठी पाणी सोडले आहे.मात्र या दरम्यान १५ एप्रिल ते १५ मे या महिन्याच्या कालखंडात कालव्यांच्या नजीकचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून उभी पिके जळून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या बाबत जलसंपदा विभागाच्या कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता भारत दिघे यांचेशी संपर्क साधला असता तो प्रस्थापित होऊ शकला नाही.मात्र एका अधिकाऱ्याने मात्र वीज जोडण्या खंडित केल्या असल्याची बाब मान्य करून कालव्यावरील अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी व बिगर सिंचन (पिण्याचे) पाण्याचे नियोजन करण्यासाठी हा वीज पुरवठा काही काळ बंद करणे हि बाब अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
गत पावसाळ्यात दारणा धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणे काठोकाठ भरली आहेत.या भरवशावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणावर केली आहे.मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी असतानाही पावसाळा जवळ आला असतानाही नाशिक जलसंपदा विभागाने उन्हाळी आवर्तन देण्यास मोठा विलंब केला आहे.त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे.अनेक दिवसापासून शेतकरी आवर्तनाची मागणी केली होती मात्र वर्तमानात कोरोना या साथीचे मोठे प्रमाण असल्याने सरकार व प्रशासन याचा बंदोबस्त करण्यात व्यस्त आहे.त्यामुळे शेती आवर्तनाची कोणालाही आठवण आली नाही.शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.आता उशिराने आलेल्या आवर्तनामुळे आता तरी नुकसान झालेल्या पिकांना दिलासा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.मात्र जलसंपदानाने आवर्तन सोडण्या आधी जिल्हाधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करून पाणी आवर्तन सोडण्याच्या वेळी कालव्यालागत असलेल्या विहिरी व शेतजमिनीत असलेल्या विजेचा पुरवठा खंडित करावा अशी मागणी केली होती त्याला जिल्हाधिकऱ्यानी परवानगी दिली असून गोदावरी कालव्यांच्या लगत असलेला विद्युत पुरवठा आगामी ५ मे पर्यंत खंडित केला आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.व त्यांनी हा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.