कोपरगाव शहर वृत्त
…या मतदार संघात विकास कामांचे होणार उदघाटन !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या व नव्याने करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मंगळवार दि.०५ रोजी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकतीच मुंबईतून शिर्डी व कोपरगाव नजीक चांदेकसारे व सोनेवाडी परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी महायुती सरकारने मंगळवार (दि.२९) रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची घोषणा केली आहे.त्यानंतर आठच दिवसांनी राधाकृष्ण विखे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी कोपरगाव दौऱ्यावर येत असून मंगळवार दि.०५ रोजी ते संपूर्ण दिवस कोपरगाव मतदार संघात राहणार आहे.
या दौऱ्यासाठी सकाळी दहा वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंत्री विखे यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.त्यानंतर अकरा वाजता माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन व सुरेगाव व कुंभारी येथील शासकीय वाळू डेपोचे एक मे च्या घोषणेनंतर तब्बल सात महिन्यांनी ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.दुपारी एक वाजता संवत्सर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ होणार आहे.त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत संवत्सर-कान्हेगाव वारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.दुपारी दीड वाजता संवत्सर येथील श्री शनि महाराज मंदिरासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी महाराष्ट्र राज्य सहकारी दुध संघाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन घेऊन चार वाजता गोदावरी खोरे दूध संघाच्या सोलर प्लँटचा पायाभरणी शुभारंभ तसेच ‘लोकनेते नामदेवराव परजणे पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स’चा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.सायंकाळी पाच वाजता कोपरगाव शहरातील निवारा कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ व शहरातील व्यापारी तसेच नागरिकांशी महसूलमंत्री विखे हितगुज साधनार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी शेवटी दिली आहे.