सहकार
खाजगी साखर कारखान्यांची स्पर्धा,सजग राहण्याची गरज-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील काही वर्षात राज्यातील खाजगी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सहकारी साखर कारखान्यांना खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करावी लागत असून सहकारी कारखानदारी टिकविण्यासाठी सतत जागृत रहावे लागणार असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची को-२६५ या ऊस जातीला पसंती असून हा ऊस परिपक्व होण्यासाठी १३ ते १४ महिने कालावधी लागत असल्यामुळे गळीत हंगाम सुरू करतांना परिपक्व ऊसाचा प्रश्न निर्माण होतो.त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करावी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने प्रसारित केलेल्या नवीन उसाच्या १८१२१ सारख्या ऊसाची लागवड करावी”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी कारखाना.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा २०२२-२३ या वर्षाच्या ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष दिलीप बोरनारे व त्यांच्या धर्म पत्नी अलका बोरनारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवणी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव एस.डी.शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थानचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मागील दोन वर्षापासून राज्यात उसाचे क्षेत्र वाढत आहे व साखर कारखानदारी देखील वाढली आहे.मात्र दुसरीकडे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे.त्यामुळे यापुढील काळात ऊस तोडणी यंत्राची गरज भासणार असल्याचे वार्षिक सभेचे भाषणांची पुनरावृत्ती त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.चालू हंगामात राज्यामध्ये १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र गाळपास उपलब्ध असून हेक्टरी सरासरी टनेज ९५ मे. टन गृहीत धरून १३८ लाख टन साखर उत्पादन होईल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे.त्याप्रमाणे कारखान्याने देखील ७.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. हवामान खात्याकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचा अंदाज सांगितला असून अजूनही पाऊस सुरूच आहे आजही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे त्यामुळे ऊस तोडणीसाठी अडचणी निर्माण होणार आहे.
सर्वच शेतकऱ्यांची को-२६५ या ऊस जातीला पसंती असून हा ऊस परिपक्व होण्यासाठी १३ ते १४ महिने कालावधी लागत असल्यामुळे गळीत हंगाम सुरू करतांना परिपक्व ऊसाचा प्रश्न निर्माण होतो.त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करावी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने प्रसारित केलेल्या नवीन उसाच्या १८१२१ सारख्या ऊसाची लागवड करावी असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक वसंतराव आभाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.