कोपरगाव तालुका
गुणवत्ता सुधार समितीवर गटशिक्षणाधिकारी काळे यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जा मध्ये सुधारणा व्हावी,आधुनिक काळाबरोबरचे तंत्रज्ञान आत्मसात करून ‘दिल्ली नगर निगम’च्या धर्तीवर महाराष्ट्रातील शाळांमध्ये मूलभूत अभ्यासक्रम व शिक्षण देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने सात सदस्यीय समिती गठीत केली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांची निवड करण्यात आली आहे.त्याच्या निवडीचेस सर्वत्र कौतुक होत आहे.
नवगठीत ही समिती दिल्ली येथे जाऊन तेथील सर्व शाळांचा दौरा करून उपलब्ध मूलभूत सुविधा व वापरली जाणारी अध्यापन पद्धती, साधने, शाळांना पुरविण्यात आलेल्या सोयीसुविधा या सर्वांचा अभ्यास करणार आहे.
राज्यातील शैक्षणिक धोरणांमध्ये आगामी काळात मूलभूत बदल करून जागतिक स्तरावर माहिती व तंत्रज्ञानासाठी उपयुक्त असे शिक्षण मुलांना देण्यासाठी व या कामी योग्य अशा शैक्षणिक साहित्य सोयी-सुविधा तंत्राचा अवलंब ‘दिल्ली नगर निगम’ ने ज्याप्रमाणे केला आहे त्याचप्रमाणे राज्यात करण्यासाठी ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे अवर सचिव सुनिल हंजे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा शासन निर्णय दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आला आहे.