सहकार
गटातील उशिरा ऊस तोडणी,शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
उत्तर नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आधी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील ऊस आणून त्याचे गाळप करून गटातील ऊस शेतकऱ्यांना पाणी नसताना वेठीस धरून त्यांच्या ऊसाचे सुमारे १५-२० टक्के नुकसान केल्याने गटातील शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखानदारांनी तेवढी भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.मच्छीन्द्र खिलारी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील सहकारी साखर कारखानदार आपल्या वडिलांची कीर्ती सांगत आपले कर्तृत्व झाकून ठेवत आपली दुकाने मोठ्या थाटात चालवताना दिसत आहे.अलीकडील काळात या सहकारी साखर कारखानदारांनी आपल्या कारखान्यांची गाळप क्षमता वाढवून कार्यक्षेत्रातील सभासदांचा ऊस हा राखीव ठेवून आधी गेटकेन ऊस आणण्याकडे कल वाढला आहे.त्यातून अर्थातच त्यांना हा गेटकेन ऊस स्वस्तात मिळत असतो हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.आणि त्यात गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्काने काटा मारता येत असल्याने त्यांचा त्याकडे ओढा असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.त्याचा विपरीत परिणाम गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहे.त्यांच्या विहिरींची भूजल पातळी खोलवर जाऊन त्याचा टचका ऊसाच्या वजनास बसत आहे.त्यांचे वजन घटत आहे.परिणामी ऊस उत्पादनात सुमारे १५-२० टक्के अशी मोठी घट होताना दिसत आहे.मात्र याची कोणालाही फिकीर असल्याचे दिसत नाही.यात साखर कारखानदारांना ऊसाची रिकव्हरी वाढताना होत असून त्यात ऊसाचे वजन घटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत कोणीही बोलताना दिसत नाही.या प्रकरणी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.मच्छीन्द्र खिलारी यांनी आवाज उठवला असून या बाबत शेतकऱ्यांचा पाठींबा वाढताना दिसत आहे.
दरम्यान साखर कारखानदार हे ऊस उत्पादक शेतकऱ्याना वार्षिक सभेत आपले बौद्धिक पाजळत शेतकऱ्यांनी ऊसाची कोणती जात शेतात लावली पाहिजे हे ठरवताना दिसत आहे.शेतकऱ्यानं ऊसाची अमुक तमुक जात लावावी,जी साधारण बारा महिन्यांत परिपक्व होते.त्यातून उसाचे वजन वाढ थांबून साखर उतारा वाढतो व त्यांचा अधिकचा फायदा साखर कारखानदारांना होताना दिसत आहे.त्याबाबत साखर कारखानदार ऊस लागवडी नुसार ऊस तोडीचे नियोजन ठरवतात.मात्र त्याला गटातील ऊसाचा अपवाद असल्याचे दिसून आले आहे.त्यातून वाढे वाढताना मर्यादा येत असल्याने शेतकऱ्यांचे नूकसान होताना दिसत आहे.
शेतकऱ्याला ऊसाला भाव प्रति टन मिळतो व अधिक एफ.आर.पी.प्रमाणे भाव ठरलेला असतो.पण तो कुणीच देताना दिसत नाही.वर्तमान काळात या साखर कारखानदारांनी नवीन युक्ती शोधून काढली आहे.ऊस उशिरा तोडायचा.म्हणजे ऊसात साखरेचा उतारा व टक्केवारी वाढते व कारखान्याचा फायदा होतो.जेवढा ऊस उशिरा तोडला तेवढे त्याचे वजन घटते.यात शेतकऱ्याचे नूकसान होत आहे.अलीकडील काळात ऊस तोडणी कामगार आणि मुकादम हे एकरी पाच ते सात हजारांची रक्कम शेतकऱ्याकडून लुटताना दिसत आहे.शिवाय शेतकऱ्याचा ऊस पेटवून देतात व नंतर तो दोन तीन दिवसांनी तोडतात परिणामी उसाच्या वजनाची मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे.यावर शेतकरी हैराण झाले आहे.ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांची कसोटी पाहताना दिसत आहे.रात्री बेरात्री शेतकऱ्यांना उठवून त्यांच्या शिदोरीची सोय करावी लागत आहे.त्यामुळे ऊस कोणासाठी लावायचा हा यक्ष प्रश्न अलीकडील काळात निर्माण झाला आहे.यावर साखर कारखाण्याचे अध्यक्ष सोयीस्कर मौन पाळत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत अड्.मच्छीन्द्र खिलारी यांनी जोरदार टीका केली आहे.व साखर कारखानदारांनी गटातील शेतकऱ्यांना सुमारे २० टक्के भाववाढ द्यावी अशी महत्वाची मागणी केली आहे.त्यावर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.