महिला बाल कल्याण
महिलांना संकट काळात मदत करणे म्हणजेच महिला दिन-…प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
‘जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वत:विषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे.वर्तमानात समाज माध्यमांवर महिला दिनाच्या पर्जन्यासारख्या शुभेच्छा पडत आहेत.शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते,ही अतिशय चिंतनीय बाब आहे,महिलांना संकट काळात मदत करणे हाच खरा महिला दीन असल्याचे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“महिलांचे विधवा होणं हा तिचा गुन्हा नाही,तिच्यावर आलेलं ते संकट आहे.तिला सांभाळून घेणं ही आपली जबाबदारी आहे.तिचा यथोचित सन्मान राहणं गरजेचं आहे”-माजी आ.स्नेहलता कोल्हे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
सरकार मान्यता प्राप्त नवक्रांती कौशल्य विकास प्रशिक्षण अकॅडमी,कोपरगाव तसेच जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.शिलाई मशीन व आरी वर्क या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व सर्टिफिकेट वितरण व विविध क्षेत्रातील महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बोलत होत्या.
सदर प्रसंगी यावेळी कार्यक्रमास सहकार महर्षी कोल्हे कारखाना संचालक रमेश घोडेराव,नवक्रांती संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बागुल,राजश्री बागुल आदींसह महिला भगिनी व विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,”छत्रपती शिवरायांनाही माँ जिजाऊनी घडवलं म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली.एका स्त्रीमध्ये भरपूर ताकद आहे.देशातील प्रत्येक महापुरुष हा एका स्त्रीच्या पोटी जन्मलेला आहे आणि त्या माऊलीने त्याला घडवलेले आहे.म्हणून प्रत्येक नवीन जीवास जन्म देण्याची ताकद आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. स्त्रीशक्ती ही लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा आणि अन्नपूर्णा या रूपांत आहे.बाई माणसाचा जन्म हा आपला अभिमानाचा आहे.महिलांच्या जीवनात आव्हानं खूप आहेत,परंतु आपल्याला या परिस्थितीशी मिळत-जुळत करून घ्यायचं आहे.आपल्यापुढे इतिहास आहे की यापूर्वी महिलांनी किती मोठं योगदान दिलेलं आहे.अशा महिलांची उदाहरणं आपल्यासमोर खूप आहेत.आपल्यातीलच आदिवासी समाजातील एक भगिनी द्रौपदी मुर्मू सध्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत आणि देशाचे सर्व आर्थिक व्यवस्थापन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाहत आहेत.म्हणजे दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची अर्थव्यवस्था पाहणाऱ्या त्या देखील एक भगिनी आहेत. महणून आपण कुठेही कमी नाही,हे सर्व महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे.आपल्याला कोणाशी भांडायचं नाही,तर मांडायचं आहे की आम्ही सुद्धा काही करू शकतो,हे दाखवून द्यायचं आहे.कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना महिलांनी स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ काढावा.सर्वांच्या आरोग्यासोबत स्वतःचंही आरोग्य सांभाळावं.आपल्या परिवारावर प्रेम तर कराच,परंतु स्वतःवरही प्रेम करा,असा सल्ला त्यांनी महिला भगिनींना दिला.माझ्याकडे काही नाही,याचा विचार सोडून आपल्याकडे काय आहे ते बघा.यावेळी विधवा महिलांच्या बाबत बोलताना त्या म्हणाल्या की,”विधवा होणं हा तिचा गुन्हा नाही,तिच्यावर आलेलं ते संकट आहे.तिला सांभाळून घेणं ही आपली जबाबदारी आहे.तिचा यथोचित सन्मान राहणं गरजेचं आहे, असे आवाहन त्यांनी शेवटी उपस्थित महिलांना केले आहे.


