पुरस्कार,गौरव
संगीता मालकर यांची…या पुरस्कारासाठी निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोना काळात ज्यांनी आपले पती गमावले आहेत अशा एकल महिलांचे पुनर्वसन करण्यात व शासकीय योजना मिळून देण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या श्रीमान गोकुळचंद विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती संगीता अरविंद मालकर यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार-२०२२ जाहीर झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबद्दल श्रीमती मालकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्रीमती संगीता मालकर यांनी स्थापन केलेल्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरगाव शहर आणि तालुक्यातील एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या असून या महिलांना संघटीत करून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यात मोलाची मदत केली आहे.
सन-२०२१-२२च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शालेय शिक्षण विभाग स्तरावर ही निवड झाली आहे.शासनाने प्रवर्ग निहाय १०८ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.यात प्राथमिक वर्गातील ३८,माध्यमिक ३९,आदिवासी क्षेत्र १८,आदर्श शिक्षिका पुरस्कार ८,विशेष शिक्षक कला-क्रीडा १-१ असे २,दिव्यांग शाळा शिक्षक -१,स्काऊट गाईड २ असे एकूण १०८ शिक्षकांचा समावेश आहे.
पुरस्कार वितरण दि.०३ जानेवारी २०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुंबई येथे संपन्न होणार आहे.
श्रीमती मालकर यांनी त्यासाठी विविध सामाजिक उपक्रम,शिबिरे,चर्चासत्रे,मार्गदर्शन शिबिरे सातत्याने आयोजित केली आहे.त्यातून या महिलांना रोजगार निर्माण करण्याची महत्वाची भूमिका निभावल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतली आहे.व त्यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्राथमिक वर्गातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार-२०२२ साठी निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीचे कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पद्माकांत कुदळे,उद्योजक कैलास ठोळे,सुधाभाभी ठोळे,विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.