निवडणूक
नगरपरिषद निवडणुकीत गुन्हेगारीला राजाश्रय !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील अभियंत्यांच्या वीस लाखांच्या घर फोडीचे सोने घेण्यात एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी सामील असल्याचे उघड झाल्याने शहरातील राजकीय गुन्हेगारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे.हे कमी की काय दोन्ही गडावरून दिलेल्या उमेदवारात गुटखा,मटका,वाळूचोरी,दरोडा,रेशन घोटाळा,गोळीबार आदी गुन्ह्यातील जवळपास 12 ते 13 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यातील राजकारणात आता ज्यांची जागा दरवाजाच्या बाहेर आहे ते सिंहासनावर बसण्याची जोरदार तयारी सुरू असल्याने शहरात याबाबत जोरदार उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव अजित पवार गट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोळगाव थडी येथील चोरीचे सोने खरेदी करणारा धारणगाव रोड येथील फरार आरोपी महेश उदावंत व त्याचा भाऊ योगेश उदावंत यांचा कोणताही संबंध नाही असे म्हणून कानावर हात ठेवले आहे.
राज्यातील बहुचर्चित नगरपरिषद निवडणूक म्हणून गणली गेलेली कोपरगाव नगरपरिषदेचे नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची न्यायिक प्रकियेमुळे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती.त्याचा प्रस्थापित काळे-कोल्हे गटाने चांगलीच बाजी मारली असून यात दुसऱ्यांदा निवडणूक संपन्न होत असल्याने अपक्ष उमेदवार केंव्हाच बाद झाले आहे.त्यांचे शहरात ना बॅनर दिसत आहे ना घोडा गाड्या दिसत आहे.विरोधी गटात उमेदवार देण्यात एकमत न झाल्याने ही निवडणूक आता केवळ ईशान्यगड आणि पश्चिम गडाच्या टप्प्यात आली आहे.आणि आता सर्व निवडणुकीची सूत्रे त्यांच्या ताब्यात गेली असल्याचे बोलले जात आहे.निवडणुक ही केवळ औपचारकिता उरली असल्याचे समजले जात आहे.आणि त्यात ईशान्य गडाची आघाडी असल्याचे बोलले जात आहे.त्याला कारणही पुढे तसेच आले असून आ.काळे गटाने आपल्या उमेदवार देण्यात निष्ठावानांना डावलले आहेच पण नगरसेवक पदासाठी थैलीशहांना पायघड्या टाकल्या असल्याचे बोलले जात आहे.शिवाय ओबीसी उमेदवार न दिल्याने मोठी नाराजी आहे.त्यात आणखी एक भर दोन्ही गटाकडून पडली असून त्यांनी दोन्ही गटाकडून जवळपास बारा ते तेरा उमदेवार असे दिले आहे की त्यांचेवर अवैध गुटखा,मटका,वाळूचोरी,दरोडा,रेशन घोटाळा,गोळीबार आदी गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.विशेष म्हणजे कोळगाव थडी येथील सुमारे वीस लाखांची ज्या अभियंत्याची घरफोडी झाली आहे त्यात चोरीचं सोनं खरेदीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा दुय्यम पदाधिकारी आढळला आहे.

“राजकारण म्हणजे केवळ सत्तेच्या क्षेत्रात काही कारभार करणे व निवडणूक लढविणे नसून समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे.सामाजिक क्रांती हेच आपल्या सार्वजनिक जीवनाचे एक उद्दिष्ट बनले पाहिजे.देशाचा विकास व समृद्धी चारित्र्याचे ते एक साधन बनले पाहिजे”असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते.तो आता इतिहास झाला आहे.
दरम्यान त्याचे नाव महेश उदावंत असं असून तो पोलिस तपासात निष्पन्न झाला आहे.मात्र तो वर्तमानात पसार आहे.त्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी एक शिवसेनेचा माजी पदाधिकारी कार्यरत आहे.या प्रकरणी फरार महेश उदावंत याचा भाऊ योगेश उदावंत आणि महिला आरोपी शीला काळे हिचा न्यायालयाने जामीन अर्ज कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयाने फेटाळला आहे.त्यांने आता जिल्हा व सत्र न्यायालयातून अंतरिम जमीन मिळवला असल्याची माहिती आहे.त्यामुळे आता पुण्यामुंबईत गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याच्या बातम्या आता कोपरगाव शहर वासियाना वाचण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे.विशेष म्हणजे पश्चिम गडाच्या उमेदवारीत जवळपास एकूण 30 उमेदवारांपैकी 17 उमेदवार हे आयात करावे लागले आहे.परिणामी पक्षात आपल्या चपला झिजवणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असल्याची भावना निर्माण झाली असल्यास नवल नाही.आधीच ओबीसी उमेदवार नाकारले असल्याचे त्याचा ताप आधीच आलेला असताना हा दुहेरी ताप राष्ट्रवादीला झेलावा लागणारा आहे.एका गटाने तर स्वामी समर्थ मंदिरासमोर विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या गोळीबारात सामील असलेल्या उमेदवाराला पायघड्या अंथरल्या आहेत.

दरम्यान दुसऱ्या एका गटाने रेशन घोटाळ्यात सामील असलेल्या गड्यास पोटाशी कवटाळले आहे.तर एकाला मुख्यमंत्र्यांच्या सभेत जाहीर प्रवेश देऊन सन्मान केला आहे.त्यामुळे या निवडणुकीत मतदारांसमोर काय वाढून ठेवले आहे हे उघड्या डोळ्यांनी पहावयास मिळत आहे.त्यामुळे कोणाला छातीशी आणि कोणाला पायाशी धरायचे याचा निर्णय करण्याची वेळ मतदारांवर आली असल्याचे बोलले जात आहे.आगामी वीस डिसेंबर रोजी ते किती डोळसपणे मतदान करणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.या निवडणुकीत शहरातील मतदार किती योग्यतेचे हे सिद्ध करण्याची ही वेळ त्यांच्यावर आली असल्याचे समजले जात आहे.
“राजकारण म्हणजे केवळ सत्तेच्या क्षेत्रात काही कारभार करणे व निवडणूक लढविणे नसून समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे.सामाजिक क्रांती हेच आपल्या सार्वजनिक जीवनाचे एक उद्दिष्ट बनले पाहिजे.देशाचा विकास व समृद्धी चारित्र्याचे ते एक साधन बनले पाहिजे” असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते.तो आता इतिहास झाला असून आता सत्ता हेच पुढारी आणि कार्यकर्त्यांचे सर्वस्व बनले आहे.या काळात या अपेक्षा करणारे मूर्ख ठरत आहेत इतकेच.



