निवड
..या तरुणीची पुरवठा अधिकारीपदी निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिद्द,कष्ट आणि कुटुंबाच्या त्यागाच्या बळावर यशाची शिखरे सर करता येतात,याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून शहरातील उषाताई पवार ही तरुणी ठरली असून तिने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लक्षवेधी यश केले असून तिची नुकतीच तालुका पुरवठा अधिकारीपदी निवड झाली आहे तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“उषाताईं पवार हि ज्या परिस्थितीतून पुढे आली आणि तालुका पुरवठा अधिकारी पदावर निवड झाली ही बाब सामान्य ठरत नाही यश लक्षवेधी असून आगामी तरुण आणि तरुणींना प्रेरणादाई ठरणार आहे”- मंगेश पाटील,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
दरम्यान उषाताईं पवार हिच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष आणि त्यागाची मोठी कहाणी दडली आहे.आईने झाडू काम करून संसाराचा गाडा ओढला,तर भाऊ ज्ञानेश्वर पवार यांने अनेक वर्षे चर्मकारितेचे काम करत तिला या यशापर्यंत पोहचविण्यात मदत केली आहे.परिस्थितीचे चटके सहन करत बहिणीच्या स्वप्नांना पंख देणारा हा आदर्शवत भाऊ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला असल्याचे मानले जात आहे.
“गरीबी आडवी आली तरी स्वप्नांना खीळ बसू दिली नाही,” हे उषाताई पवार हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सेवानिवृत्त अभियंता माधवराव पाटील व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उषाताईंच्या जिद्दीचे कौतुक करत,“संघर्षातून उभे राहून मिळवलेले यशच समाजाला दिशा देणारे ठरते,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
उषाताई पवार यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संघर्षमय परिस्थितीतून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे.त्याच्या या यशाचे आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी अभिनंदन केले आहे.



