शैक्षणिक
भाषणाची कला जोपासण्यासाठी ऐकणे महत्वाचे-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भाषणाची कला जोपासण्यासाठी नामवंत वक्त्यांची भाषणे ऐका व आपले भाषण आटोपते घ्यावे यासाठी उपस्थितांवर टाळ्या वाजविण्याची वेळ येवू देवू नका असा असे आवाहन पत्रकार सतिष वैजापूरकर यांनी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“भाषण कला साध्य करण्यासाठी आवड असली तरी आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचा सखोल अभ्यास देखील अत्यंत महत्वाचा आहे.विचार आणि शब्दांना धार निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाने शब्दांची मांडणी गरजेची आहे”-पुष्पाताई काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कनिष्ट महाविद्यालयात सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पुष्पाताई काळे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे,सुरेगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सुमन कोळपे,उपसरपंच सीमा कदम,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरु कोळपे,सदस्य भाऊसाहेब लुटे,सुरेगावचे माजी सरपंच सचिन कोळपे,श्रीकांत काळे,मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे,पत्रकार सचिन देशमुख,विलास दवंगे,डॉ.आय.के.सय्यद,आबा आभाळे,बाळासाहेब ढोमसे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,”माजी खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांनी आयुष्यातील उमेदीची वर्ष रयत शिक्षण संस्थेसाठी खर्चे केली.त्यांनी केलेलं काम मोठं होतं मात्र त्यांनी त्या कामाचा कधी गवगवा केला नाही.त्यांच्याकडे समाजासाठी झिजण्याची वृत्ती होती.ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे सुशीलामाईंनी हट्ट केल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची मोठी सोय झाली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी पुष्पाताई काळे बोलताना म्हणाल्या की,”भाषण कला साध्य करण्यासाठी आवड असली तरी आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचा सखोल अभ्यास देखील अत्यंत महत्वाचा आहे.विचार आणि शब्दांना धार निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाने शब्दांची मांडणी जरुरी असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थी दशेत असतांना छोट्या पडद्यावरील दाखविण्यात येणाऱ्या विविध मराठी-हिंदी वाहिन्यांवरील मालिकांच्या संस्कृती बिघडविणाऱ्या व्यक्तिरेखांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडू देवू नका.दाखविण्यात येत असलेल्या गोष्टी खऱ्या नसतात त्या गोष्टींचा मनावर चुकीचा परिणाम होतो.त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून आपले आईवडील नेहमीच आपले हित बघतात त्यांच्या विचारांचे पालन करा असे आवाहन पुष्पाताई काळे यांनी शेवटी केले आहे.