निवडणूक
आता ठाकरेंचा जय महाराष्ट्र …!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका शिवसेनेच्या उबाठा गटाचे तब्बल २० वर्षे तालुकाध्यक्ष पद सांभाळलेले शिवाजी ठाकरे यांनी सेनेच्या अंतर्गत वादाला कंटाळून आपला राजीनामा देऊन अजित पवार पूरस्कुत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तर्क कुतर्काना उधाण आले आहे.

दरम्यान याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी ठाकरे हे सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक वर्षापासून इच्छुक होते मात्र त्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही त्यामुळे त्यांनी नाराज होऊन पक्षाला अखेरचा ‘ जय महाराष्ट्र’ …! केला असल्याचे मानले जात आहे तर दुसऱ्या तर्कानुसार त्यांना पंचायत समितीच्या वारी गणातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या ग्रामीण भागातील महत्वाच्या असणाऱ्या नागपरिषदा,जिल्हा परिषद,पंचायत समित्याच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा गट आणि गणाची प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यात २०२२ च्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील दुरूस्तीनूसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जास्ती जास्त ७५ तर कमीत कमी ५० गट राहणार आहे.त्यात्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहे.आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने २०१७ असलेले आरक्षण कायम केले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली आहे.तर पंचायत समिती,जिल्हा परिषदेबाबत नागरिकांकडून हरकती मागवल्या असून आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा शिमगा आता नक्की रंगणार हे उघड झाले आहे.त्यामुळे राजकीय पक्ष आपले घोडे,नाल,तंग तोबरा,गोळा बारुद जमा करायला लागणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.तर इच्छुक उमेदवार आणि नाराज कार्यकर्ते आदींच्या नाराजीचा कडेलोट झाल्याने त्यांनी आपल्या वाटा शोधण्यास प्रारंभ केला आहे.परिणामस्वरूप पक्षांतराच्या बेडूक उड्या सुरू झाल्याचे दिसत आहे.याची सुरुवात कोपरगाव मतदार संघात शिंगवे या ठिकाणी सुरू झाल्याची चुणूक पहायला मिळाली असताना आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याआधी त्याची सुरुवात शहर शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव यांनी करून रिक्षा सेनेचे अध्यक्षपद सोडून व आता थांबणार असल्याची घोषणा करून केली होती.असे असताना शिवसेनेचे निष्ठावान गणले जाणारे उद्धव सेनेचे २० वर्षे तालुकाध्यक्ष पद भूषवलेले कार्यकर्ते व कडवे शिवसैनिक शिवाजी ठाकरे हे काळेवासी म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आ.आशुतोष काळे गटात सामील झाले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शिवसेनेला नेमके काय झाले असे म्हणण्याची वेळ आली असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकेकाला गळाला लावून फोडा तोडाचा मंत्र वापरून प्रस्थापितांनी ‘ स्लो पॉयझन’ दिले जात असल्याचे समजले जात आहे.हा पक्षप्रवेश आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवशी झाला आहे.त्यामुळे या प्रवेशासाठी ह.भ.प.ठाकरे (महाराजांनी) यांनी श्रावणी सोमवार का निवडला हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.