निवडणूक
आता राष्ट्रवादीतही धुलाई मशीनचे आगमन !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीची उलटसुलट चर्चा सुरु असताना भाजप कोल्हे गटाला मात्र कोपरगाव शहरात मोठा धक्का बसला असून कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (काळे गट)मध्ये जाहीर प्रवेश केला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटातही भाजप छाप धुलाई मशीन उपलब्ध झाले का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.त्याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक अनपेक्षित पक्षांतरं झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावेळी यासंदर्भात मोठी चर्चा झाली असून आता पुन्हा एकदा एक चर्चेतलं पक्षांतर राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलं आहे.माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही अर्थात भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.मुळात अजूनतरी या पक्षांतराची फक्त चर्चाच असताना त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.मात्र कोपरगाव तालुक्यात मात्र वेगळा पॅटर्न सुरु असल्याचे दिसत असून कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कुठलाही मागमूस नसताना येथे पक्षांतर घडू लागले असल्याचे दिसून येत आहे.यात प्रमुख नाव माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचे नाव आघाडीवर आहे.त्यांनी माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर हा विशेष शुद्धीकरण विधी उरकला आहे.त्यात माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव,तसेच उल्हास पवार,सुरेश पवार,ओम आढाव,ऋषिकेश आढाव,नवनाथ बढे या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.त्यामुळे आता भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीत भाजप च्या कार्यकर्त्याना घेऊन शुद्धीकरण होताना उलट प्रवाह प्रवाहित होताना दिसत आहे.
दरम्यान ज्या माजी उपनगराध्यक्षांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यांचा गत आठ वर्षात तरुण असूनही लौकिक फार चांगला असल्याचे दिसून आलेले नाही.भाजपचे निष्ठावान माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या काळात माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रातून पाणी योजनेसाठी जो ४२ कोटींचा निधी आणला होता.त्याचे बिल काढण्यासाठी परळीस्थित ठेकेदार यांचेकडून २५ लाख रुपयांची बिदागी मिळाली असल्याचा भर सभागृहात आरोप झाला होता.त्यानंतर त्यांचेवर ईशान्य गडावरील युवराजांची ऐतराजी ओढवली होती.त्यांच्यात कधीच परत सूत जुळले नसल्याची माहिती आहे.त्यामुळे आता भाजपचा हा खास,’ वाण नाही पण;गुण आता राष्ट्रवादीस लागला असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,महात्मा गांधी जिल्हा चरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव,अशोक आव्हाटे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.