दुष्काळ
शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या-…या आमदारांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे खरीप पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली खरीप पिकांची वाढ खुंटली आहे.हि पिके भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे.त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी शासनाने मदत निकषांमध्ये शिथिलता करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

“पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या असून एक डिसेंबरपासून रब्बीचे आवर्तन देण्यात येणार आहे.त्यानुसार जाहीर केलेल्या तारखांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.आवर्तनाच्या नियोजनात कोणताही बदल झाल्यास त्याचा परिणाम पुढील पिकांवर होऊ शकतो.त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणी मिळावे आणि पुढील रब्बी पिकांसाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात यावे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
राज्यात पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यामुळे खरीप पिके होरपळून निघाली असून,विविध राजकीय नेत्यांकडून व विरोधकांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि तालुक्यांमध्ये ३० ते ४० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने मोठी तूट निर्माण झाली आहे.राज्य सरकारने या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार,लवकरच दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन निर्णय जारी केला जाईल व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.अशी घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज कृषी मंत्र्यांच्या ऑनलाइन सहभाग नोंदवून ही मागणी केली असल्याचे समोर आले आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पावसाचा मोठा खंड पडल्यानंतर केवळ एक दिवस सुमारे तीन मिलिमीटर पाऊस झाला.त्यामुळे कागदोपत्री पावसाचा खंड तुटला असला तरी प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीमध्ये कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही.पावसाच्या प्रमाणाबाबत कृषी विभागाने निश्चित केलेली अडीच मिलिमीटरची अट शिथिल करून ती किमान पाच मिलिमीटरपर्यंत करण्यात यावी,तरच प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते.कोपरगाव तालुक्यात केवळ ४३.३९ टक्के शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली आहे. त्यामुळे ई-पिक पाहणीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही.प्रत्यक्ष पिकांची परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीचा विचार करून ई-पिक पाहणीची अट शिथिल करावी व पात्र शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.ऊसाची परिस्थितीही चिंताजनक असून पावसाअभावी ऊसाची वाढ खुंटली आहे.उपग्रहाच्या माध्यमातून पाहणी केल्यास ऊसाचे क्षेत्र हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्ष शेतामध्ये परिस्थिती गंभीर आहे.शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याची उपलब्धता असली तरी विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही.प्रत्येक शेतकरी पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असूनही पावसाअभावी आणि वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे पिकांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे.त्यामुळे केवळ उपग्रहावरील हिरव्या क्षेत्राच्या आधारे परिस्थितीचे मूल्यमापन न करता प्रत्यक्ष शेतातील वस्तुस्थिती विचारात घ्यावी.तसेच ज्यावेळेस शासनाकडून एक रुपया पिक विमा योजना राबविण्यात येवून शेतकऱ्यांचा पीक विमा शासनामार्फत भरला जात होता त्यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळत होता.मात्र सदरची योजना बंद झाल्यामुळे विमा उतरविण्यात ५०% घट झालेली आहे.त्यामुळे बहुतांशी शेतकरी पिक विम्या पासून वंचित राहणार आहे याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.प्रत्यक्षात कोपरगाव तालुक्यात आज अखेर ४३.३९% पीक पाहणी झालेली असून उर्वरित ५६% पीक पाहणी प्रलंबित आहे. असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.
पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या असून एक डिसेंबरपासून रब्बीचे आवर्तन देण्यात येणार आहे.त्यानुसार जाहीर केलेल्या तारखांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.आवर्तनाच्या नियोजनात कोणताही बदल झाल्यास त्याचा परिणाम पुढील पिकांवर होऊ शकतो.त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणी मिळावे आणि पुढील रब्बी पिकांसाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात यावे.यासाठी पाटबंधारे विभागाकडूनही दक्षता घेतली जावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली.



