आंदोलन
अकोलेतील दुर्घटनेस पालकमंत्री जबाबदार,त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्या-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोणतेही लेखी पत्र न देता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले.त्या आवर्तनात दोन युवक व तीन जवानांसह स्थानिक तरुण बुडाले.त्यांचा शोध घेण्यास काही काळासाठी निळवंडे धरणातून आवर्तन बंद न केल्यामुळेच तीन जवानांसह एक युवक बुडून मरण पावले असून सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे हेच जबाबदार असून त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटून या पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र हादरला होता.दरम्यान अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे पाण्यात बुडून मरण पावलेल्या दुर्घटनेत गणेश देशमुख हे शहीद जवानांच्या मदतीला माहीतगार म्हणून गेले असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला होता.ते प्रकरण आता आणखी पेटणार असल्याचे दिसत असून यात ही मागणी पुढे आली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की”,लष्करी जवानांसारखेच त्यांनाही शहिदाचा दर्जा देण्यात यावा.शासनाने यातील पीडित कुटुंबियांस आधार देत आर्थिक मदत द्यावी.कोणतेही लेखी पत्र न देता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले,त्या आवर्तनात बुडालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यास काही काळासाठी धरणातून आवर्तन बंद न केल्यामुळेच तीन जवानांसह एका स्थानिक युवकाचा नाहक मृत्यू झाला.या गोष्टींला पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे जबाबदार असून त्यांनी तात्काळ आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान चितळवेढे (ता. अकोले) येथील घाटातील वळणावर ६ मे २०२४ रोजी रात्री ११ च्या सुमारास उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकीवर दगडफेक करून हल्ला केला.याबाबत ७ मे २०२४ रोजी पहाटेपर्यंत राजूर पोलीस ठाण्याअंतर्गत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी स्वतः उपस्थित राहून फिर्याद दाखल केली.या घटनेला गुरुवारी १४ दिवस उलटून गेलेत.वंचित बहुजन आघाडीचे अकोल्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र पवार यांनी या घटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करूनदेखील पोलीस प्रशासनाने तपासाबाबत कोणतीच हालचाल केली नाही.या घटनेतील हल्लेखोर ताबडतोब शोधून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
तहसीलदारांना हे निवेदन सादर करताना उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासोबत रिपाईचे माजी तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे,चंद्रकांत पवार,किशोर रुपवते,अनुराधा आहेर,प्रकाश जगताप,रमेश वाकचौरे,प्रविण देठे,गणेश गुरूकुले,सागर दिवे, मनोज सोनवणे,रघुनाथ सोनवणे,जीवन सोनावणे,जगन्नाथ सोनवणे,दिपक गायकवाड,प्रवीण कोंडार,सुरेश जाधव आदींसह वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोले तालुक्यातील ग्रामीण भागांत व भंडारदरा धरण परिसरातून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.त्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,याअनुषंगाने गुरूवारी (३० मे) अकोले तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचे ठरले,पण निवडणूक आचारसहिंता नियमांचे पालन व तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून गुरूवारी आयोजित बैठकीस हजर राहिलो आहोत,असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पवार यांनी स्पष्ट केले.
निवेदनात पुढे नमूद आहे की,”राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री दादासाहेब रूपवते व माजी शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या उत्कर्षा रुपवते नात असून काँग्रेसचे नेते तत्वनिष्ठ प्रेमानंद रूपवते याची कन्या आहे.तसेच त्या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य व वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डीतील महिला उमेदवार आहेत.फिर्यादीची पार्श्वभूमी अशी असूनदेखील त्यांच्यावरील हल्लाच्या तपासाबाबत पोलीस प्रशासनाने अजिबातच गांभीर्याने घेतलेले नाही हे पोलीसांच्या दुर्लक्षित व निष्क्रिय तपासातून दिसते. पोलीसांच्या या दुर्लक्षित व टाळाटाळीच्या निषेधार्थ तीव्र जनआंदोलन छेडू,असा इशारा शांताराम संगारे यांनी दिला.
यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे,राजूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपक सरोदे यांनी निवेदन स्वीकारले.तर उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या हल्लेखोरांच्या शोधकार्यात पोलिसांचा गतीने तपास सुरू असून लवकरच हल्लेखोर शोधून काढण्यास आम्हांस यश मिळेल, याबाबत आमचे प्रयत्न सुरूच आहेत अशी माहीती पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांना दिली.मात्र या खुलाशावर वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलीस यंत्रणेकडून हल्लेखोर शोधकार्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल निषेध व्यक्त केला.