अपारंपरिक ऊर्जा विभाग
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ त…या १० गावांचा समावेश !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील शेतकरी व वीज ग्राहकांच्या विजेच्या समस्या निवारण करण्यासाठी सौर उर्जा सबस्टेशनची निर्मिती करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील दहा गावांमध्ये सौर उर्जा सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना २.० या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी,भोजडे,मळेगाव थडी,वडगाव,धामोरी,येसगाव,नाटेगाव,काकडी चांदगव्हाण,मुर्शतपूर या १० गावातील एकूण ३७.५३ हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा निर्मिती सबस्टेशन उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
सौर ऊर्जा स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे.सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कुठल्याही प्रकारच्या ज्वलन होत नाही.उष्ण कटिबंधातील आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असलेला स्त्रोत आहे.त्यामुळे राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा पर्याय भक्कमपणे उभा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ व्यापकपणे राबविण्याचा निर्धार केला होता.त्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौर उर्जेला व्यापक चालना देणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ही योजना शासनाने अंमलात आणली आहे.त्यात जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत.त्यामुळे शेतीला दिवसा बारा तास वीजपुरवठ्याबरोबरच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे.वीजेची वाढती मागणी पाहता भविष्यात क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून शेतीचे वीजदर मर्यादित ठेवण्यावर मर्यादा येऊ शकते.त्यादृष्टीने वीज ग्राहक,शेतकरी व वीज निर्मिती क्षेत्र अशा सर्वांसाठी ही योजना उपयुक्त आहे.त्यानुसार डिसेंबर २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी वीजपुरवठा सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे. ‘मिशन २०२५’च्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची वेगाने व व्यापक अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे.

यात कोपरगाव तालुक्यातील डेवाडी,भोजडे,मळेगाव थडी,वडगाव,धामोरी,येसगाव,नाटेगाव,काकडी चांदगव्हाण,मुर्शतपूर या १० गावातील एकूण ३७.५३ हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा निर्मिती सबस्टेशन उभारण्यासाठी मंजुरी दिली असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.
यामध्ये दहा गावातील क्षेत्र व त्यांची क्षमता पुढीलप्रमाणे असून यामध्ये धोंडेवाडी येथील २.१८ हेक्टर क्षेत्र व क्षमता ११.०६ एम.डब्लू,भोजडे २.१८ हेक्टर क्षेत्र क्षमता ६.५७ एम. डब्लू,मळेगाव थडी ४.९३ हेक्टर क्षेत्र व क्षमता १०.२७ एम.डब्लू, वडगाव १० हेक्टर क्षेत्र व क्षमता ७ एम.डब्लू, धामोरी ८ हेक्टर क्षेत्र क्षमता ७ एम.डब्लू, येसगाव २.४६ हेक्टर क्षेत्र व क्षमता ५.३७ एम.डब्लू,नाटेगाव ६ हेक्टर क्षेत्र व क्षमता ५.३७, काकडी ३.९६ हेक्टर क्षेत्र व क्षमता १.७८ एम.डब्लू, चांदगव्हाण ८.७७ हेक्टर क्षेत्र व क्षमता २१.६६ एम.डब्लू, मुर्शतपूर २.२५ हेक्टर क्षेत्र व क्षमता ५.५६ एम.डब्लू, अशा १० गावात एकूण जवळपास ५१.२१ हेक्टर क्षेत्रावर हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहे.त्याबद्दल आ.काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.