व्यक्ती विशेष
राज्याची थोर कीर्तन परंपरा सुरू ठेवणारे,’माऊली महाराज’

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे,माणिक उगले)
महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला मोठे महत्व असून ही कीर्तन सेवा ईश्वर प्राप्ती साठी करायची असताना राज्यातील कीर्तनकार कोण किती बिदागी घेतो यासाठी चर्चिले जात असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रुई येथील कीर्तनकार माऊली महाराज शिंदे हे मात्र एक रुपयाची बिदागी घेत तर नाहीच पण स्वतःचे अन्न आणि पाणी बरोबर घेऊन कीर्तन करत असल्याची कौतुकास्पद बाब समोर आली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांना दुसरे मामा दांडेकर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

‘जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥धृपद॥
तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥-संत तुकाराम महाराज.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कीर्तन परंपरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.किंबहुना कीर्तन संस्था ही महाराष्ट्राचीच नव्हे तर एकुणातच तमाम भारतीयांच्या सांस्कृतिक व आधात्मिक जीवनाचे भरणपोषण करणारे महत्त्वाचे केंद्र आहे.या परंपरेचा उगम थेट प्राचीन पुराणग्रंथात तसेच वैदिक काळातही सापडतो.यावरून या माध्यमाची प्राचीनता व मौलिकता स्पष्ट होते.कीर्तन या शब्दाचे अनेक अर्थ दिसून येतात.स्तवन करणे,स्तुतीस्तोत्र गाणे,गुण वर्णिने किंवा कथीने,हरिदास वगैरे वीणादी गाण साहित्य घेऊन देवळात परमेश्वराचे उभ्याने गुणवर्णन करतात ते.महर्षी नारदांना या संस्थेचे जनक मानले जाते.त्यामुळेच या व्यासपीठाला नारदाची गादी म्हणण्याचाही प्रघात आहे.वारकरी पंथात कीर्तनाच्या प्रवर्तकाचा मान संत नामदेवांना दिला जातो.नारदीय कीर्तन,वारकरी कीर्तन,रामदासी कीर्तन आणि लोकमान्यांनी सुरू केलेला राष्ट्रीय कीर्तन हा नवा प्रवाह असे कीर्तनाचे विविध प्रकारही पडतात.रंजन व प्रबोधनाचे अत्यंत सुलभ व प्रभावी साधन म्हणजे कीर्तन होय.कीर्तन ही दृकश्राव्य कला आहे.‘नाचू कीर्तनाच्या रंगी। ज्ञानदीप लावू जागी। अशी प्रतिज्ञा करून संत नामदेवांनी आत्मजागृतीचे,भागवत धर्माचे प्रसाराचे कार्य केले,तर संत गाडगेबाबांनी या कीर्तनाला संवादात्मक रूप देऊन समाज जागृतीचे कार्य केले.संत तुकडोजी महाराज यांनी ते पुढे नेले.यावरून ह्या कलेचे महात्म्य लक्षात येते.राज्याच्या आणि देशाच्या अनेक थोर विचारवंतांनी कीर्तन परंपरेचा मुक्तकंठाने गौरव केला आहे.मात्र अलीकडील काळात हा मोठा पैसा कमवण्याचा धंदा झाला असल्याचे दिसून येत आहे.संत गाडगेबाबा यांचे कार्य आठवा त्यानी आधी श्रम केले त्याचं वेळी कीर्तन केले.कीर्तनाचा एक रुपया घेतल्याचे कोणी वाचले आहे का ? मामा दांडेकर हे प्राध्यापक होते,आयुष्यभर फुकट कीर्तन प्रवचन करून एक चांगला उपक्रम सगळ्यांच्याच समोर ठेवला पण त्याचा भविष्यात काहीच उपयोग झाला नाही असे आज दिसत आहे.परमार्थ हा व्यवसाय झाला आहे.कीर्तनकार आणि इतर मंडळी मिळुन कमित कमी पंधरा हजार ते पन्नास हजार,लाख बिदागी घेतात.कलियुगात भक्ती विकली जाते.या बाबत मागे एका वर्तमानपत्राने राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांचा कीर्तनाचा दरच प्रसिद्ध केला होता.वर्तमानात कीर्तन हे आता करमणूक करण्याचे साधन झाले असल्याचे दिसत आहे.कीर्तनकार अलिशान कार मधून त्याचा लवाजमा घेऊन फिरतो.बरेचसे तर सोन्यात,दागिण्यात मढलेले असतात.ऊंची कपडे,त्यांच्यासाठी खास जेवण वगैरेची सोय केली जाते.अलीकडील काळात मामा दांडेकरांचा प्रसिद्ध वारसा नाशिक जिल्ह्यातील घोटीचे ब्रह्मलीन संत श्रीपाद महाराज यांनी चालवला होता.कीर्तन करून ते आपली वाट धरत असतं.मात्र ज्या ठिकाणी ते मुक्काम करत त्यावेळी त्यांचे शिष्यगण त्यांचे अंघोळीच्या वेळी खिसे तपासत असतं.महाराजांचे खिशात रक्कम नसली तर ती अलगत टाकून देत.खिशात काही पै-पैसा नसला तर तो संपेल तेथून पायी प्रवास सुरू करत असतं.आज असे कीर्तनकार दुर्मिळ झाले आहे.मात्र त्यांचा वारसा चालवणारे महाराज म्हणून निफाड तालुक्यातील रुई येथील माऊली महाराज शिंदे यांचे नाव समोर आले आहे.त्यामुळे ते आपोआप कौतुकास पात्र ठरत आहे.त्यामुळे आता या महाराजांचे बिन पैशाचे कीर्तन म्हणजे मोठे आश्चर्य मानले पाहिजे.संत तुकाराम महाराज यांनी तर कीर्तनकार कसा असावा यांचा वस्तुपाठच घालून दिला आहे.त्यांनी आपल्या गाथेत त्याबाबत सांगून ठेवले आहे.
जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥धृपद॥
तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
याचा अर्थ “जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये.तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये.आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये.आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे.तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघानाही नरक प्राप्त होते.पण आता धनलोलुप कीर्तनकारास सांगायचे कोणी असा प्रश्न निर्माण न झाला तर नवल !
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडवा आणि हनुमान जयंती महोत्सव किर्तन सोहळा सुरू असताना निफाड तालुक्यातील रुई येथील माऊली महाराज शिंदे यांची ०९ एप्रिल रोजी कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे मोठ्या उत्साहात कीर्तन सेवा पार पडली आहे.त्यावेळी ही बाब लक्षात आली आहे.याबाबत महाराजांनी सांगितले की,”आपण २० ते २५ वर्षापासून कुठेही कीर्तनाला गेलो तर एक रुपया घेत नाही.कीर्तनाला गेल्यानंतर संत तुकाराम महाराज याचे उपदेशाप्रमाणे तिथे बुक्का सुद्धा लावत नाही.”हार तुरे सुद्धा घेत नाही,कीर्तनाचे पैसे ही फार दूरची गोष्ट” जाण्या येण्याचे भाडं हा फंडा तर नाहीच” स्वतःच्या दुचाकीवर किर्तनाला आपण स्वतः होऊन येत असतात.स्वतःचे पाणी बरोबर आणलेले असते.कीर्तनाचे ठिकाणी ते अन्न ग्रहण करत नाही.आपले गाई आणि आई हेच देव आहे.यांचीच आपण रोज देवपूजा करतो आणि म्हणून भाविकांनी आगामी काळात महाराजांना कीर्तन सेवा देताना त्यांचे आचार विचार कसे आहेत याचा विचार केला पाहिजे’ मगच त्यांची कीर्तन सेवा ठेवली पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.आज अनेक महाराज लोक कीर्तनाचे पैसे घेतात हे मोठे दुर्दैव आहे.त्यांचा एक आदर्श सगळ्यां कीर्तनकारांनी घेतला पाहिजे आणि असेच गावोगावी निस्वार्थ कीर्तन सेवा देणारे कीर्तनकार तयार झाले पाहिजे.त्यांचा रुई तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आश्रम आहे.वर्तमानात या माऊली महाराजांची समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे.