जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढविण्याच्या तहसीलदारांना सूचना

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या एस.एस.जी.एम.महाविद्यालयात सुरु असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये मर्यादा येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात राहून बाधित रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावे यासाठी ३५० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिल्या आहेत.

गुरुवार रोजी एकाच दिवशी सहा कोरोना बाधित रुग्णांचे निधन झाले आहे यावरून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे.गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे.जाणे गरजेचेच असेल मुखपट्या,प्रतिबंधात्मक औषधांचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी सहकार्य करा-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोनाची लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांच्या संख्येत रोज शेकडोने भर पडत असल्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये बेडसंख्या कमी पडत आहे.त्यामुळे अनेक बाधित रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात बाधित गंभीर रुग्ण उपचार घेत असून त्याठिकाणी देखील रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे बाधित रुग्णांसाठी नवीन कोविड केअर सेंटर सुरु करणे गरजेचे होते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आ. काळे यांनी त्याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना सूचना दिल्या.त्या नुसार कोपरगाव शहर व परिसरातील बाधित रुग्णांना उपचार घेण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे यासाठी कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वसतिगृहाची तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पाहणी केली.या वसतिगृहात ३५० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर चांगल्या प्रकारे सुरु होवू शकते याची खातरजमा करून तहसीलदार चंद्रे यांनी आरोग्य विभागाला या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत आदेश दिले आहेत.त्यानुसार या ठिकाणी लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु होणार आहे.

प्रशासनाच्या वतीने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.तहसीलदार चंद्रे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,आरोग्य अधिकारी समन्वयक डॉ.वैशाली बडदे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक तुकाराम देसले,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव आदि सर्व विभागाचे अधिकारी स्वत:चा जीव धोक्यात घालुन नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत.मात्र नागरिकांनी देखील खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गुरुवार रोजी एकाच दिवशी सहा कोरोना बाधित रुग्णांचे निधन झाले आहे यावरून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे.गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळावे.जाणे गरजेचेच असेल मुखपट्या,प्रतिबंधात्मक औषधांचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी सहकार्य करा असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे. आरोग्य विभाग कोरोना बाधित रुग्णांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेवून आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांची सेवा सुश्रुषा करीत आहे. मात्र गुरुवार (दि.१) रोजी एकाच दिवशी सहा कोरोना बाधित रुग्णांचे निधन झाल्यामुळे काहीशा चिंता वाढल्या असल्या तरी अशी परिस्थिती यापुढे उदभवणार नाही यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे.कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तातडीने संपर्क करावा.तसेच ज्या सामाजिक संस्थांकडे वसतिगृह उपलब्ध आहेत त्या संस्थांनी अशा संकटाच्या वेळी पुढे येवून बाधित रुग्णाच्या विलगीकरण कक्षासाठी आपणाकडील वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून बाधित रुग्ण या विलगीकरण कक्षात राहतील व कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात आळा बसेल. यासाठी सामाजिक संस्थांनी त्यांच्याकडे असलेली वसतिगृह उपलब्ध करून देवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close