महसूल विभाग
सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले,तीन ग्रा.पं.सदस्य अपात्र !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्या प्रकरणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जालिंदर आनंदा गरुड,अशोक तुकाराम जगताप व लंकाबाई किशोर भाबड आदी तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अपात्र केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिलेले आहे.या प्रकरणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोतीराम भाबड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.त्यामुळे माजी आ.कोल्हे गटास मोठा धक्का बसला असून या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे तीन सदस्य हे ग्रामपंचायतीच्या गट क्रं.८० मध्ये अतिक्रमण करून राहत असल्याचे व त्यांचेकडे वैयक्तिक जमीन असताना त्यांनी हे कृत्य केले असल्याचे कोपरगाव गटविकास अधिकाऱ्यांच्या समक्ष पाहणी अहवालात ते दोषी आढळून आले आहे.ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गारुड व अशोक जगताप यांचे कडे वैयक्तिक मिळकत असताना त्यांनी ‘ती’ लपवून शासकीय योजनांचा लाभ घेतला असल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हि अपात्रतेची कारवाई केली आहे.
ग्रामिण पातळीवर अतिक्रमण हा विषय अत्यंत संवेदनशील मानला जातो.ब्रिटिश काळापासून गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शासकीय जमिनी गुरेचरण,गायरान जमिनी,स्मशान भूमी,सण उत्सव आदी साजरे करण्यासाठी राखीव ठेवलेल्या असतात.व त्या ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या असतात.मात्र अलीकडील काळात सदर जमिनी अतिक्रमण करण्यासाठीच असतात असा बऱ्याच जणांचा समज झालेला असतो.त्यात सामान्य मागास व आदिवासी जण असतील तर एक वेळ समजू शकते मात्र त्यात सरपंच,उपसरपंच आणि सदस्य अशी जबाबदारी सांभाळणारी माणसे असतील ती चिंतेची बाब ठरते.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.सदर ग्रामपंचायत हि माजी आ.कोल्हे गटाच्या ताब्यात असल्याचे समजते.त्यातील जालिंदर आनंदा गरुड,अशोक तुकाराम जगताप व लंकाबाई किशोर भाबड आदी तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरवले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिलेले आहे.
ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१) ज-३ व १६ मधील तरतुदी नुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य हा त्याच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरतो.ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीने जरी अतिक्रमण केले किंवा कुटुंबीयांनी अतिक्रमण केलेल्या जागेत राहत असेल असा कोणताही व्यक्ती ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अपात्र असतो.याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने जनाबाई विरुद्ध अतिरिक्त आयुक्त मधील निकालामध्ये अतिक्रमणाबाबत अतिक्रमण धारक स्वतः अतिक्रमण क्षेत्राचा उपभोग घेणारा,अतिक्रमण करणारा अशा व्यक्तीस सदस्य राहण्यास अपात्र ठरविण्यात आले असून तसे स्पष्ट निर्देश दिले आहे.
यातील तीन सदस्य हे ग्रामपंचायतीच्या गट क्रं.८० मध्ये अतिक्रमण करून राहत असल्याचे व त्यांचेकडे वैयक्तिक जमीन असताना त्यांनी हे कृत्य केले असल्याचे कोपरगाव गटविकास अधिकारी यांच्या समक्ष पाहणी अहवालात ते दोषी आढळून आले असल्याचे नमूद केले आहे.ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गारुड व अशोक जगताप यांचे कडे वैयक्तिक मिळकत असताना त्यांनी ‘ती’ लपवून शासकीय योजनांचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे. व त्यामुळे हि अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी अर्जदार भाऊसाहेब भाबड यांचे वतीने जिल्हाधिकारी यांचे समोर अड्.एम.यू.सय्यद यांनी जोरदार यूक्तिवाद केला होता.