न्यायिक वृत्त
कोपरगाव शहरातील विकास कामांचा पुन्हा एकदा कपाळ मोक्ष !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात आपल्याच प्रभागातील रस्त्यांची २८ कामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या विरोधात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अपिलाचा निकाल लागून त्याची शाई वाळलेली नसतानाच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हे गटाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्याची खात्रीलायक बातमी हाती आली असून त्या बाबत नगरपरिषदेला माहिती प्राप्त झाली असून त्यानी संबंधित ठेकेदारांना काम तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील नागरिकांचा विकास कामांचा कपाळ मोक्ष झाला असल्याचे मानले जात आहे.त्याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान याबाबत आम्ही राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांचेशी संपर्क साधला असता त्यानी,”दीड वर्षा पूर्वी विधानसभेत झालेला पराभव माजी आ.कोल्हे यांना पचवता आलेला नाही.शहरात कमी पडलेली मते या विरोधामागे कारणं आहे,मतदारांची जिरविण्याचीही योजना असून या खेरीज आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या कामांचे श्रेय मिळू नये यासाठी हा आटापिटा सुरु असून आपले पद टिकविण्यासाठी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केलेली हि मर्कट लीला आहे” असे म्हटले आहे.
लोकशाहीत विरोधक कितीही प्रबळ असले तरी कोणत्याही विकास कामांना विरोध करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही.शहर विकासाला खोडा घालणे कायद्याला व लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना हे अभिप्रेत नाही.मंजूर निविदा रद्द करण्याचा कोणालाही बहुमताच्या जोरावर अधिकार नाही.हे लोकशाहीचे सर्वसमंत गमक आहे.मात्र हे बहुधा कोल्हे भाजप गटाला मान्य दिसत नाही.त्यामुळे बहुधा त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशालाच आव्हान दिल्याची विश्वसनिय माहिती हाती आली असून त्याला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतीनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”विकास कामांना एवढा टोकाचा खालच्या पातळीवर जाऊन विरोध होईल अशी कल्पना केली नव्हती.त्यामुळे आम्ही याबाबत न्यायालयात कॅव्हेट दाखल केले नव्हते त्याचा विरोधकांनी फायदा उपटला असून या विरोधात नगरपरिषद लवकरच आपले म्हणणे मांडणार असून कामे त्वरित सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”
कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह अठ्ठावीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी साधारण फेब्रुवारी महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला होता.त्या बाबत सुनावणी पूर्ण झाली असून त्या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि.२३ मार्च रोजी जाहीर केला होता.त्या बाबत कामाचे आदेश संबंधित ठेकेदारांना होऊन त्यांनी जवळपास बहुतेक कामांना प्रारंभ केला होता.मात्र अस्वस्थ कोल्हे गटाच्या हा विषय पचनी पडला नाही व त्यांनी या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निकालाला दि.२५ जून रोजी आव्हान दिले आहे.व त्या स्थिगितीचे आदेश नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे पदाधिकारी व माजी पदाधिकारी यांनी या आदेशाची प्रत ३० जून रोजी स्वहस्ते दिली आहे.त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.त्याबाबत आगामी २३ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान याबाबत उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”दि.१६ फेब्रुवारी रोजी सर्व साधारण सभेतील विषय क्रं.११ हा जिल्हाधिकाऱ्यांनी तहकूब करण्याचा दिलेला असताना तो नजरेआड करण्यात आला आहे.आमचा २८ कामांना विरोध नाही.पण जी कामे अनावश्यक आहे ती रद्द करावी असे म्हणणे असताना नगराध्यक्ष वहाडणे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे,त्यामुळे त्या कामांना स्थगिती दिली आहे”.