जलसंपदा विभाग
दुष्काळी पाझर तलाव आधी भरून द्या,खा.वाकचौरेंकडे केली मागणी

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे सुमारे सहा टी.एम.सी.पाणी दुष्काळी भागात तीन आवर्तनात द्या अशी आग्रही मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी आज दुपारी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,जलसंपदा अधिकारी यांचे उपस्थितीत आयोजित संगमनेर प्रांत कार्यालयातील बैठकीत केली आहे.

सदर प्रसंगी कार्यकर्ते विलास गुळवे यांनी जाळी निमगाव ते गोगलगाव उर्वरित कालवा पूर्ण करण्याची व डाक पाझर तलाव एस्केप देण्याची मागणी खा.भाऊसाहेब वाकचौरे व जलसंपदा अधिकारी यांचेकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी जाण्यास कारणीभूत असणाऱ्या अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या ४० वर्षापूर्वी भुसंपादित साईड गटारी व सलग्न नाले आदींचे काम निळवंडे कालवा कृती समितीने वारंवार मागणी करूनही जलसंपदा विभागाने अद्याप पूर्ण केलेले नाही.पहिल्या चाचणी पाण्यात नुकसान झालेल्या अकोलतील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई जाणीवपूर्वक दिलेली नाही.वितरण व्यवस्थेचे काम हवे तसे वेगात सुरू झालेले नाही.काही दुष्काळी गावांना अद्याप पुर पाण्याने पाझर तलाव भरून दियलेले नाही या पार्श्वभूमीवर आज शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे याच्या अध्यक्षतेखाली जलसंपवा अधिकारी व महसूल अधिकारी यांची संयुक्त बैठक आज संगमनेर प्रांत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यासाठी कमी असून पश्चिमघाट माथ्याचे पाणी वाढविण्याची सूचना नानासाहेब जवरे यांनी केली असून खा.वाकचौरे यांनी त्यासाठी आपण दिल्लीतून मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.दरम्यान तळेगाव दिघे आणि दुष्काळी अपेक्षित असलेल्या गावांना प्राधान्य क्रमाने पाणी द्यावे अशी मागणी रमेश दिघे,मच्छिंद्र दिघे,सचिन दिघे आदींनी केली आहे.
सदर प्रसंगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विशाल यादव,निळवंडे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे,धारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,समितीचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,उत्तम घोरपडे,उपाध्यक्ष सोन्याबापू उर्ह्रे,माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,उत्तमराव जोंधळे,विलास गुळवे,सौरभ शेळके,वाल्मीक भडांगे,साहेबराव गव्हाणे,ज्ञानेश्र्वर हारदे,भिवराज शिंदे,सचिन दिघे,अशोक गांडोळे,संदेश देशमुख,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे,नाना नेहे,ज्ञानेश्र्वर नेहे,उत्तमराव थोरात आदीसह मोठ्या संख्येनं शेतकरी व समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी काले यांनी म्हंटले आहे की,”निळवंडे धरण आठमाही असून तो बारमाही करणे गरजेचे आहे.त्यासाठी साम्रद नाला व हिवरा नाला या दोन नाल्याद्वारे याद्वारे सुमारे पावणे दोन टी.एम.सी.पाणी उपलब्ध होणार आहे.सदर पाणी मराठवाड्यात जाणे कोणालाही परवडणारे नाही.ते उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना देणे गरजेचे आहे.त्यात संगमनेर तालुक्यातील ८० तर राहाता तालुक्यातील ३७,कोपरगाव १३,राहुरी २१,अकोले २१,सिन्नर ०६,श्रीरामपूर ०४ आदी गावांना फायदा होऊ शकणार आहे.या दुष्काळी १८२ गावांना पिण्याचे आरक्षण उत्तरेतील नेत्यांनी वरिष्ठ पदे भूषवत असतानाच्या काळात अद्याप दिलेले नाही.
दरम्यान गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे.त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष होत असतो.पाण्याचा उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.यावेळी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विषय घेतला असून आपली सकारात्मकता दाखवून दिली आहे ही समाधानाची बाब असताना या खात्याचे मंत्रीपद विखे यांना मिळाल्याने नगर जिल्ह्यातील दुष्काळी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्यांनी या प्रश्र्नी लक्ष घालणे गरजेचे बनले असल्याचे मत व्यक्त केले आहे.
नगर-नाशिक आणि दुष्काळी मराठवाडा आदीसाठी एकूण ३० प्रवाही वळण योजना प्रस्तावित असून यापैकी १४ वळण योजना पूर्ण झाल्या असून त्याद्वारे १.०७ टीएमसी पाणी वळविले जात आहे व ५ बांधकामाधीन वळण योजनांद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल.तर ११ भविष्यकालीन योजनाद्वारे ४.९८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टी.एम.सी.पाणी वळविण्याचे प्रस्तावित असून त्याअंतर्गत तीन प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे.या योजनेंतर्गत सध्या काही नदीजोड प्रकल्पांवर काम सुरू आहे.याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,रुपेंद्र काले आदींनी गतवर्षी ०५ जानेवारी २०२४ रोजी जनहित याचिका क्रं.०५\२०२४ दाखल केली असल्याचे सांगून लक्षवेध केला आहे.
यावेळी खा.वाकचौरे यांनी या प्रष्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.त्यावेळी खा.वाकचौरे यांनी अपेक्षित शेतकऱ्यांना आधी पाणी द्या,कालवे अस्तरीकरण वेग वाढवा,दुष्काळी शेतकऱ्यांना पाणी देताना प्राधान्य द्या असे आदेश दिले असून दुष्काळी पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली आहे.त्यावेळी जलसंपदा अधिकारी प्रदीप हापसे आणि कालवा विभागाचे अधिकारी कैलास ठाकरे यांनी पाणी देण्याचे व अकोलेतील शेतकऱ्याची नुकसान भरपाई लवकरच देण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यावेळी विलास गुळवे यांनी जाळी निमगाव ते गोगल गाव उर्वरित कालवा पूर्ण करण्याची व डाक पाझर तलाव एस्केप देण्याची मागणी केली आहे.त्यावेळी खा.वाकचौरे यांनी तसा प्रस्ताव देण्याचे व निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यासाठी कमी असून पश्चिमघाट माथ्याचे पाणी वाढविण्याची सूचना केली असून आपण दिल्लीतून मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.दरम्यान तळेगाव दिघे आणि दुष्काळी अपेक्षित असलेल्या गावांना प्राधान्य क्रमाने पाणी द्यावे अशी मागणी रमेश दिघे,मच्छिंद्र दिघे,सचिन दिघे आदींनी केली आहे.