गुन्हे विषयक
समृध्दीवरील चोरीतील तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चंदेकासारे हद्दीतील समृध्दी महामार्गावरील लोखंडी अँगल चोरीला गेली होते त्याची चौकशी कोपरगाव तालुका पोलिसांनी केली असता आरोपी हे भोजडे येथील रहिवासी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी सापळा लावला असता त्यात आरोपी सागर हनुमंत आहेर (वय-२४) व अशोक बळीराम आहेर (वय-२९) आदींना अटक केली असून मुद्देमाल घेणारा दहिगाव बोलका,शिवाजीनगर येथील आरोपी विजय संजय मुळेकर यास मुद्देमालासह अटक केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान यातील आरोपी करून एक ०४ लाख रुपये महिंद्रा पिकप गाडी (क्रं.एम.एच.०४ जी.आर.६८५०) हिचे सह ६५ हजार १०० रुपयांचे स्टील अँगल असा ०४ लाख ६५ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.पोलिसांचे या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”समृध्दी महामार्गावर वर्तमानात काम सुरू असून त्यांचे विविध ठिकाणी साहित्य असते.मात्र या मार्गावर गत सात ते आठ वर्षात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून अनेक वेळा त्यांच्या गाड्यांचे इंधन चोरीस गेले होते तर अनेक ठिकाणी सिमेंटसह अन्य चीजवस्तू चोरीस गेल्या होत्या.त्यांनी वेळोवेळी गुन्हे दाखल केलेले आहे.काही वेळा चोर सापडले तर काही वेळा त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे.मात्र यावेळी पोलिसांनी आपल्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला असून त्यात त्यांना यश आलेले दिसून येत आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी मूळ पुरंदर येथील रहिवासी असलेला असून तो वर्तमानात महामार्गावरील पर्यवेक्षक पदावर काम करत आहे त्याचे नाव मोहन विठ्ठल निगडे हे आहे.तो कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तात्पुरता व्यवसायानिमित्त रहिवासी असून तेथे त्याचे महामार्गाचे समान ठेवण्याचे गोदाम आहे.फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता की,” त्यांच्या गोदामातून दि.०८ जानेवारी २०२५ रोजी सुमारे ६५ हजार १०० रुपयांचे लोखंडी अँगल चोरीस गेले होते.त्यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या गुन्हा क्रं.१/२०२५ हा भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
कोपरगाव तालुका पोलिस या चोरट्यांच्या शोधात असताना त्यांना गुप्त खबऱ्यामार्फत खबर मिळाली की त्यांचा माल आणि चोरटे अमुक ठिकाणी आहेत.त्याप्रमाणे पोलिसांनी पाळद ठेवली असता चोरटे त्यांच्या अलगत जाळ्यात अडकले आहेत.त्यातील चोरटे भोजडे येथील रहिवासी असून चोरटे सागर हनुमंत आहेर (वय-२४) व अशोक बळीराम आहेर (वय-२९) आदींना अटक केली असून मुद्देमाल घेणारा दहिगाव बोलका शिवाजीनगर येथील आरोपी विजय संजय मुळेकर (वय-३५) यास मुद्देमालासह अटक केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांना फिर्यादी आणि नागरिकांनी धन्यवाद दिले आहे.
दरम्यान ही कामगिरी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौढरी,पो.कॉ.रशीद शेख,प्रकाश नवाळी,किसन सानप,मधुसूदन दहिफळे आदींनी चोख बजावली असून त्यात त्यांनी सापळा रचण्यात व आरोपी आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.