कोपरगाव शहर वृत्त
नाले सफाई न झाल्यास नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार-इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पावसाळा सुरू होवूनही अद्याप पर्यंत कोपरगाव नगरपरिषदेकडून नाले सफाई न झाल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.त्यामुळे चार दिवसात कोपरगाव नगरपरिषदेने नाले सफाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला दिला आहे.
“कोपरगाव परिसरात काही दिवसांपासून नियमित पाऊस पडत असल्यामुळे नाले तुंबण्यास सुरुवात झाली असून सुभाष नगर,संजय नगर,समता नगर,खडकी परिसरातील दोन्ही नाले तसेच इतर भागातही नाल्यातून सांडपाणी वर येवून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कारवाई करणे गरजेचे झाले आहे”-संदीप वर्पे,कार्याध्यक्ष,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.
पावसाळा सुरू होवून जुन महिना संपला आहे.यावर्षी पाऊस थोडा उशिरा आला आहे त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेला नाले सफाई करण्यासाठी मोठा अवधी असतांना देखील कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने नाले सफाई करण्यात दिरंगाई केल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत असून हा कोपरगावकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे.
काही दिवसांपासून नियमित पाऊस पडत असल्यामुळे नाले तुंबण्यास सुरुवात झाली असून सुभाष नगर,संजय नगर,समता नगर,खडकी परिसरातील दोन्ही नाले तसेच इतर भागातही नाल्यातून सांडपाणी वर येवून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या पाऊस कमी प्रमाणात असूनही नाले सफाई नसल्यामुळे नाले तुंबन्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे जास्त पाऊस झाल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना न केलेलीच बरी.
त्यामुळे येत्या चार दिवसात कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील सर्वच प्रभागातील नाले सफाईचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरीषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष वर्पे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला शेवटी दिला आहे.