जाहिरात-9423439946
आंदोलन

जलतरण तलावाच्या आंदोलनासह,कोपरगावात तीन आंदोलन मागे !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरीकांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलतरण तलाव होऊन जवळपास पाच-सहा वर्ष उलटून गेली आहे.मात्र त्यात माणसे तर जाऊद्या साधे कुत्रेही पोहू शकले नाही म्हणून सदर तलाव पूर्ववत सुरु करावा या प्रमुख मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,मार्गदर्शक सुनील फंड,योगेश गंगवाल आदींनी आज आत्मदहनाचा इशारा दिल्यावर आज नगरपरिषद प्रशासनास जाग आली असून त्यांनी सदर जलतरण तलाव पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन देऊन त्याचे काम सुरु केल्याने आज होणारे ‘आत्मदहन आंदोलन’ स्थगित केले असल्याची माहिती संतोष गंगवाल यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान आज पत्रव्यवहार करूनही घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने तो मिळण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील ग्रामस्थ किसान ठकाजी पवार यांचे आणखी एक आंदोलन कोपरगाव तहसील कार्यालयासमोर होणार होते.मात्र त्याची वेळीच दाखल गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी घेतल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.याशिवाय नगर-मालेगाव या रस्त्याची दुरास्था दूर करण्यासाठी रुपेश देविदास थोरात यांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आश्वासन देऊन तेही स्थगित केले आहे.त्याना नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी आश्वासन दिले आहे.

कोपरगाव शहर अनेक राजकीय आश्चर्यांनी भरले आहे.येथे कोणतीही विकास कामे जनतेसाठी होत नाही केवळ जनतेसाठी दाखवली जातात आणि नेते आपले उखळ पांढरे करून घेतात असे वारंवार दिसून आले आहे.येथे ग्रामपंचायत व अन्य सामान्य नागरिकांच्या ‘निवडणुक झुंजी’ लावण्यासाठी लढवल्या जातात मात्र सहकारी साखर कारखाने आणि त्यांच्या सहकारी बँका मात्र बिनविरोध होतात.सहकारी कारखाने आणि त्यांचे उपपदार्थ निर्मिती करताना ऊस उत्पादकांना भाव वाढीचे गाजर दाखवले जाते.मात्र ऊसातून कपात झाली की त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात.शिक्षण संस्थाबाबतही तीच बोंब आहे.खिसा खाली शेतकऱ्यांचा होतो मात्र नफेखोरी मात्र नेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची होते हे उघड गुपित बनले आहे.राज्य परिवहन मंडळाचे बस आगार हे जनतेसाठी बांधले असे भासवले जाते मात्र तेथे (माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळेंचा अपवाद वगळता)गाढवही लोळण्यासाठी जात नाही.कामाबाबत बोलायलाच नको.अशीच अवस्था तालुक्यातील बसस्थानके,स्मशान भूमी शेड,जलतरण तलावाची झाली आहे.हि कामे जनतेने केवळ आपली मानायची आहे.टक्केवारीची मलई मात्र नेत्यांनी खायची आहे.असा अलिखित नियमच झाला आहे.आजवर वाळू लिलाव स्थानिक कार्यकर्ते आणि वाळूचोर घेत असत मात्र आता मंत्री आणि त्यांचे नातेवाईक यांची नवीन वतने त्यात नेत्यांना व साखर सम्राटांना दिसू लागली आहेत.आता गौण खनिज खाणी,खडी,कृत्रिम वाळू हि नवीन कुरणे या पुढाऱ्यांना आणि साखर सम्राटांना दिसू लागली आहेत.त्यामुळे हि सर्व मालमत्ता लुटण्यासाठी केवळ आपला आणि आपल्या सुपुत्रांचाच जन्म झाला आहे असा आभास या नेत्यांना आणि त्यांच्या दिवट्याना दिसू लागला असल्यास नवल नाही असो.

वर्तमानात कोपरगाव शहरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे.मात्र तेथे अद्याप एकही नेता आणि त्यांचा चेला पोहण्यास गेला नाही.मग दीड कोटी रुपये किमतीचा जलतरण तलाव काय यांना आणि त्यांच्या दलालांना कमिशन खाण्यासाठीच निर्माण केला होता का असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला असल्यास नवल नाही.नेमकेणाने याच मर्मावर मनसेच्या पदाधिकांऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बोट ठेवले आहे.व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुहूर्त साधून कोपरगाव नगर परिषदेच्या समोर ‘आत्मदहन आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र आज शुभ दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडायला नको म्हणून तहसीलदार विजय बोरुडे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी त्याची गंभीर दाखल घेऊन त्यांना या पासून परावृत्त केले आहे.सदर प्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे उपस्थित होते.
दरम्यान जलतरण तलावाचे काम तात्काळ सुरु केले असून सदर तलाव सुरु करण्यासाठी आवश्यक तरतूद करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे त्यामुळे अनर्थ टळला आहे.त्याबाबत कोपरगाव आंदोलनकर्ते संतोष गंगवाल,सुनील फंड,अनिल गायकवाड,योगेश गंगवाल आदींनी समधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close