दळणवळण
बेलापूर-परळी रेल्वे मार्गाची दिशाभूल खा.लोखंडे यांनी थांबवावी-…या माजी.खा.आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून बेलापूर परळी रेल्वे मार्गाचे दिलेले निवेदन म्हणजे नौटंकीचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
“बेलापूर परळी रेल्वेमार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी-२०१८ मध्ये राज्य शासनाचा ५० टक्के खर्चाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे तसेच या मार्गाचा अहवाल केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे गेल्याने हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे केंद्रीय मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत प्रयत्न सुरु आहेत”-बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार,नेवासा.
या बाबत त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन त्यात म्हटलं आहे की,”सन-२०१२ साली बेलापूर-बीड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली या सर्वेक्षणासाठी जवळपास ०३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.या मार्गाचे सर्वेक्षण होऊन सर्वेक्षण अहवाल सन-२०१७ मध्ये केंद्रीय रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आला होता; परंतु रेल्वे बोर्डाकडून न परवडणारा शेरा मिळाल्याने कुकाणा येथील कृती समितीने त्या विरोधात,”आमरण उपोषण” “आत्मदहन” असे आंदोलने केली होती.या आंदोलनामुळे बेलापूर परळी या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली या मार्गाचे सर्वेक्षण डिसेंबर-२०१८ मध्ये पूर्ण होऊन केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला होता; परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा अहवाल समीक्षेसाठी पुन्हा मुंबई कार्यालयात आला ही माहिती मिळताच माजी खा.वाकचौरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,कृती समितीचे रितेश भंडारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या अहवालाची तातडीने समीक्षा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता.त्यानंतर हा अहवाल रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयाने ई.डब्ल्यू./५४५/जी./पी.जी./व्ही.या जावक क्रमांकाच्या पत्राद्वारे ही माहिती माजी खा.वाकचौरे व रितेश भंडारी यांना देण्यात आली असल्याची माहिती वाकचौरे यांनी दिली आहे.
“बेलापूर-परळी रेल्वे मार्गाचा अहवाल केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे गेला आहे तरीदेखील खा. लोखंडे यांनी निवेदनाद्वारे बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी केली यावरून ते मतदार संघातील कामाबाबत किती जागरूक आहेत तसेच मतदार संघातील कोणते काम कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती खा.लोखंडे यांना कितपत आहे हे यावरून त्यांचे अज्ञान समजते”-रितेश भंडारी,सचिव,बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था.
या शिवाय या मार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी-२०१८ मध्ये राज्य शासनाचा ५० टक्के खर्चाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे.या प्रस्तावासाठी नेवाशाचे तत्कालीन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा अहवाल केंद्रीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना शिर्डीचे विद्यमान खा.लोखंडे हे निवेदनाद्वारे कोणत्या मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी करत आहे असा सवाल विचारला आहे.या निवेदनात त्यांनी बेलापूर,श्रीरामपूर,नेवासा,शेवगाव,गेवराई,बीड,परळी या मार्गाने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.बेलापूर परळी रेल्वे मार्ग कोणत्या गावातून जातो हे तरी त्यांना माहित आहे का ? सर्वेक्षण अहवाल केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला असताना सर्वेक्षणाचे निवेदन देणे म्हणजे वराती मागून घोडे असा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
गेल्या आठ वर्षात या रेल्वे मार्गासाठी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न पाठपुरावा केलेला नाही.बेलापूर-परळी रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात असून त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न खा.लोखंडे यांचा सुरु आहे.२०२४ ची निवडणूक समोर ठेवून जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रकार चाललेला आहे.परंतु ही नौटंकी खूप दिवस चालणार नाही.बेलापूर-परळी रेल्वे मार्गाचे श्रेय हे कृती समितीचे भंडारी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे.या रेल्वे मार्गाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न खा.लोखंडेनी करू नये असा इशारा माजी.खा.वाकचौरे यांनी शेवटी दिला आहे.