दळणवळण
नगर-मनमाड रस्ता वाहतूक तुंबली,कोपरगावात पोलिसांची पळापळ!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर भारत व दक्षिण भारताला जोडण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नगर-मनमाड या रस्त्याची पूरती वाताहत झाली असून रस्त्यावर,”खड्डे जास्त आणि रस्ता कमी”अशी अवस्था झाली असून त्यामुळे रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. काल दुपारी चार वाजेनंतर या रस्त्यावर कोपरगाव नजीक पुणतांबा फाट्याजवळ एका अवजड टँकरचे टायर फुटल्याने सर्व वाहतूक खोळंबली होती.ती पूर्ववत करून देण्यासाठी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांना तब्बल साडेचार तास मोठी यातायात करावी लागली असून त्यानंतर हि वाहतूक सुरळीत करण्यात त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचा उपद्रव पोलिसांना विनाकारण सोसावा लागला असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.
“कोल्हार ते कोपरगाव या रस्त्यासाठी ४० कोटींची रस्ता दुरुस्तीची निविदा काढली होती.त्याची मुदत संपली नसताना हा रस्ता नादुरुस्त कसा झाला ? याची जबाबदारी निश्चित करावी त्यासाठी चौकशी समिती नेमावी व जागतिक बँकेच्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने हा नगर-मनमाड हा राज्यमार्ग पुन्हा पूर्ववत खड्डेमुक्त करावा व नागरिकांचे जीवित व वित्तीय हानी टाळावी,कर भरूनही प्रवासी व वहातुकदारांचे दुहेरी नुकसान होऊ देऊ नये”-नितीन शिंदे,तालुकाध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस.
नगर-मनमाड हा रास्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.वर्तमानात हा रस्ता हा जागतिक बँकेकडे असल्याचे आहे.मात्र गत एकवीस वर्ष हा रस्ता कधीही नागरीकांना चांगली सेवा देऊ शकला नाही.आजही या रस्त्याची देखभाल हि जागतिक बँकेचा नगर येथील विभाग पाहतो.मात्र हा विभाग असून नसल्यासारखा आहे.यावरील खड्डे कधीच बुजवले गेले नाही,बुजवले तरी ते काही काळासाठी केवळ अधिकारी आणि ठेकेदार यांची पोटे भरण्यासाठी व त्यांच्या टक्केवारीसाठी असतात.त्यांच्यावर कोणाही अधिकाऱ्याचे की राजकीय नेत्याचे नियंत्रण नसते.आपली बिले मिळेपर्यंत कधी-कधी तर बिले मिळण्याआधीच ते नादुरुस्त होतात.वर्तमानातही तेच चित्र आहे.मात्र यात कोणालाही हस्तक्षेप करावा वाटत नाही हे विशेष! पुढे रस्त्याची दुरुस्ती तर मागे रस्ता पुन्हा उदळतो असे वास्तव वर्तमानात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटावयास नको.खड्डे बुजविण्याचे श्रेय घ्यायला पुढाऱ्यांची,’पळे पळे कोण पुढे पळे तो’ची स्पर्धा असते हि बाब अलाहिदा.अशीच घटना पुणतांबा फाट्या नजीक घडली असून तेथील खड्डे हे अनेक वाहनांना कर भरूनही आपले जीवित व आर्थिक नुकसान पाचवीला पुजलेले आहे.हॉटेल आनंद व पेट्रोल पंपा समोर पडलेले खड्डे हे वास्तव सांगत सध्या पहुडले आहे.(तसे ते १०० कि. मी.परिसरात सर्वत्र आहे) त्यामुळे काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक अवजड वाहणाचे टायर फुटल्याने यांचा फटका वाहतुकीला बसला होता.नजीक असललेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीचा वेग नीचांकी झाला होता.परिणामस्वरूप सर्व वाहतूक खोळंबली त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.याची खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना काही नागरिकांनी दिली. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन हि वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु केला असता त्यात त्यांचे तब्बल साडेचार तास खर्ची पडले आहे.त्या नंतर सुमारे आठ वाजता ती पूर्ववत झाली आहे.त्यामुळे पोलिसांच्या या श्रमाचे प्रवासी,अवजड वाहतूकदार संघटना व स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.
त्यामुळे जागतिक बँकेच्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने हा नगर-मनमाड हा राज्यमार्ग पुन्हा पूर्ववत खड्डेमुक्त करावा व नागरिकांचे जीवित व वित्तीय हानी टाळावी अशी मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.