सामाजिक उपक्रम
…या गावी आदर्श शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जवळके येथील शिष्यवृती परीक्षा,लोकमंथन राज्यस्तरीय परीक्षा आणि इस्त्रोत सहलीसाठी जाण्यासाठी निवड झालेली भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी विशेष कष्ट घेणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ हा पुरस्कार देऊन आणि त्या परीक्षांत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांचा ‘गुणगौरव सोहळा’ जवळके हनुमान मंदिर सभागृहात खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे राहणार आहे.
इस्त्रो आणि नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी आयोजित सहलीसाठी अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जवळके जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीतील विद्यार्थिनी अमिता जालिंदर थोरात हीची प्रथम क्रमांकाने निवड झाली असून द्वितीय स्थानी अनन्या वाल्मीक बागल,तर तृतीय स्थानी गीता दशरथ जोरावर हीची निवड झाली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातल्या ३ शाळकरी मुला-मुलींना पहिल्यांदाच इस्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीसाठी संधी मिळाली आहे.तर या पूर्वी जिल्हा परिषद जवळके शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत २८ पैकी २५ विद्यार्थी तर राज्यस्तरीय लोकमंथन परीक्षेत ०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे यश जिल्ह्यात लक्षवेधी मानले जात असून मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांचेसह सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.त्यांचा गुण गौरव सोहळा जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.त्यासाठी वरील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले,कालवा कृती समिती,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,जलसंपदा विभागाचे माजी उपभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात आदीसह पदाधिकारी,सौर ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी कैलास कांबळे,स्वयम् उर्जाचे संचालक राहुल नलावडे,स्कीलॅशन एनर्जी ग्रुपचे संचालक अजय गोर्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान जवळके गावातील इच्छुक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या घराच्या छतावरील सौर ऊर्जेसाठी आपली नोंदणी उपस्थित राहून करावी असे आवाहन जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सारिका विजय थोरात यांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन जवळके ग्रामपंचायत सरपंच,सदस्य आदींनी केले आहे.