धार्मिक
…या तीर्थक्षेत्री वीरभद्र मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा होणार संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरभद्र महाराज मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आगामी सोमवार दि.१५ एप्रिल रोजी महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते तर महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ०६ वाजता संपन्न होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विरभद्र या पात्राची कथा पद्मपुराण आणि महाभारतात मिळते.स्वायंभूव मन्वंतरात दक्ष प्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले.मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही.शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञ समारंभात गेली.तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले.ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला.त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली.शिवाने वीरभद्राला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली. रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.या दैवताची गावोगाव स्थापना केलेली आढळून येते.कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथेही हे मंदिर असून त्या ठिकाणी विरभद्र दैवताची स्थापना सोमवार दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास करण्यात येत आहे.त्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
दरम्यान या निमित्त शनिवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजता श्री वीरभद्र महाराज यांच्या मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर सकाळी ०९ वाजता गणपती पूजन,मातृका पूजन,ब्राम्हण पूजन तर दुपारी ०३ वाजता अग्नी मंथन,नाव ग्रहण हवन,जल निवास,सायंकाळी पूजा आरती करण्यात येणार आहे.
तर रविवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजता प्रातःपुजन,अभिषेक,प्रधान हवन,शांती पौष्टिक हवन,तर दुपारी ०३ वाजता प्रधान हवन,धान्य निवास,सायंपूजा,स्तुती परिपाठ,तर सोमवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजता प्रातःपुजन,उत्तरांग हवन,बलिदान,पूर्णाहुती,मूर्ती स्थापना,कलशारोहन आदी कार्यक्रम ब्रम्हवृंदाचे साक्षीने विधिवत संपन्न होणार आहे.
त्या साठी दहिगाव बोलका आणि कोपरगाव तालुक्यातील भाविकांनी या धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.